Halloween Costume ideas 2015

शेतकर्‍यांची असहाय्यता

बांधावर नेत्यांचे दौरे : शेतकर्‍यांच्या जखमेवर फुंकर मारण्याचा प्रयत्न



“परतीच्या पावसाने महाराष्ट्रातील 22  जिल्ह्यातील शेतीचे अतोनात नुकसान केले आहे. हाता-तोंडाशी आलेली पीके डोळ्यादेखत वाहून गेल्याने शेतकरी हताश झालेले आहेत. केंद्र,राज्य शासनाने शेतकर्‍यांना सावरण्यासाठी तातडीची मदत देऊन त्यांची असहाय्यता दूर करावी. या कामी केंद्र सरकारनेही सहानुभूतीपूर्वक विचार करून तात्काळ राज्य सरकारची मदत करावी.”

 - रिजवानुर्रहेमान खान, प्रदेशाध्यक्ष जमाते इस्लामी हिंद, महाराष्ट्र.


परतीच्या पावसाने जाता-जाता तेलंगणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना अक्षर: झोडपून काढले. महाराष्ट्रातील उस्मानाबाद, नांदेड, सोलापूर सहीत 19 जिल्ह्यांत शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान केलेे. विशेष: मराठवाडा आणि पंढरपूर परिसरातील शेती अक्षर: डोळ्यादेखत उध्वस्त झाली.  सोयाबीन हे नगदी पीक असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात सोयाबीन पेरतात. अशातच हाता-तोंडाशी  आलेले सोयाबीन अतिवृष्टीमुळे  कुठे ते कुजले, कुठं त्याला मोड फुटली आणि अनेक ठिकाणी पीक कापून झाकून ठेवलेल्या गंजी डोळ्यादेखत वाहून गेल्या आणि शेतकरी असहाय्यपणे त्याकडे बघत राहिले. 

शेतकर्‍यांनी हमखास फायदा देणारे पीक म्हणून ऊसाची लागवड केली होती. त्यावरही अतिवृष्टीचा परिणाम झाला. लवकर गाळप सुरू झालं तर थोडाफार ऊस उपयोगाला येईल अन्यथा उसाचे पीकही नष्ट झाल्यातच जमा आहे. पावसामुळे शेतात साचलेले पाणी उतरायला आणि चिखल संपायला बराच वेळ  लागणार आहे. चिखलात ऊसाच्या फडात जावून तोडणी करणे शक्य नाही. म्हणजे सोयाबीन वाहून गेले आणि ऊस सडून गेले. या दोन पिकाशिवाय, तूर, कापूस, मूग, उडदाची दैना झाली. एकूणच खरीपामध्ये येणारी सर्व पीके जाता-जाता पाऊस सोबत घेऊन गेला. ग्रामीण भागात या परतीच्या पावसाला काळे दिवस म्हणून शेतकरी संबोधू लागलेले आहेत. या पीकावर शेतकर्‍यांनी जे-जे मनसूबे बांधलेले होते ते-ते उध्वस्त झालेले आहेत. राज्य शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे जरी आदेश दिले असले आणि मागच्या सरकारने सांगितलेल्या प्रमाणे 72 तासाच्या आत फोटो काढून अपलोड करायचा हे ही सोपे काम नाही. नेहमीप्रमाणे शेतकर्‍यांच्या या असहाय्यतेचा अंदाज राज्यात सर्वप्रथम शरद पवारांना आला आणि कोविडच्या साथीच्या परवा न करता या 81 वर्षीय नेत्याने थेट बांधावर जावून शेतकर्‍यांशी भेट घेऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली. केंद्र आणि राज्य शासनाकडे मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले. तदनंतर शेतीच्या नुकसान पाहणीसाठी सत्ताधारी, विरोधक आणि अन्य नेत्यांनी बांधावर गर्दी केली. शेतकरी नेते राजू शेट्टी लातुरात म्हणाले, ’शेतीचे जवळपास 50 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. केंद्र व राज्य शासनाने तात्काळ मदत द्यावी’. 

आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मात्र शेतकर्‍यांची अवस्था पाहून कोणीही नगदी मदत देण्यास तयारी दाखवत नाही. सध्या अनेक नेते शासनाकडे बोट दाखवित आहेत.  केंद्र व राज्य शासनानेही गतीने पंचनामे करावेत. महसूलचे मनुष्यबळ कमी पडले तर कोविडमध्ये जशी अन्य विभागातील कर्मचार्‍यांची सरकारने मदत घेतली तशी मदत घेऊन पंचनामे लवकर करावेत. अतिव नुकसान झालेल्या शेतकरी, मजुरांना अन्नधान्य पुरवठा करावा. अतिवृष्टीत ज्या नागरिकांच्या घरांचे नुकसान झाले आहेत. त्यांच्याही घरांचे सर्वेक्षण केले तर असहाय्य झालेल्या शेतकरी व महाराष्ट्रजनांना दिलासा मिळेल. एवढे मात्र नक्की.  


- बशीर शेख, उपसंपादक  9923715373


Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget