Halloween Costume ideas 2015

काँग्रेसचे आणखीन आमदार फुटतील !

न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी एक लेख लिहिला होता, त्यात त्यांनी महात्मा गांधीचे स्व:बद्दलचे उद्गार उधृत केले होते. ज्यात गांधी म्हणतात, ”अस्तंगत होत चाललेल्या आदर्शवादी युगाचा मी प्रतिनिधी आहे.” (संदर्भ : लोकमत, 25 जुलै 2013 पान क्र. 6).
    नेतृत्वाची खरी शक्ती नेत्याच्या नैतिकतेत लपलेली असते. नैतिकता जेवढी उच्चकोटीची असेल नेता तेवढाच उच्च कोटीचा असतो. तीच नसेल तर नेतृत्व आणि कार्यकर्ते यांच्यासाठी राजकारण ’मिशन’ न राहता ’प्रोफेशन’ बणून जाते. भारतीय राजकारणात अगदी नेहरू काळापासून नैतिक नेतृत्वाची वाणवा सुरू झाली होती. नेहरू कालीन संरक्षण विभागातील जीप घोटाळ्याने भारतीय राजकारणातील नैतिकता संकटात असल्याचा पहिला अशुभ संकेत त्याच वेळेस दिला होता. आज जसे भाजपाचे नेतृत्व सत्तास्थानातील शक्तींवर अवलंबून आहे तसेच इंदिरा काळापासून काँग्रेसचे नेतृत्वही सत्तास्थानातील शक्तींवर अवलंबून होते. ते नैतिक व आदर्शवादी कधीच नव्हते. अपवाद फक्त लालबहादूर शास्त्रींचा.
    ही सर्व भूमिका बांधण्याची गरज यासाठी पडली की सध्याच्या राज्यस्थानमधील सत्ता संघर्षाने अगदी विकृत रूप धारण केलेले आहे. कोरोनाच्या रूग्णांनी दहा लाखांचा आकडा पार केलेला असतानादेखील ज्या निर्लज्जपणे भाजपने राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला व त्याच निर्लज्जपणे काँग्रेसचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एकाच पक्षात राहून एकमेकांना सुरूंग लावण्याचा जो प्रयत्न केला, त्याचे हिडीस् प्रदर्शन पक्ष नेतृत्व असाह्यपणे पहात असून, त्याला काहीच करता येत नाही, हा या प्रकरणातील सर्वात दुर्दैवी पैलू आहे. भाजप आणि काँग्रेस दोघांनाही जनकल्याणाची चाड असती तर या राष्ट्रीय संकट समयी त्यांनी हा निर्लज्जपणा केलाच नसता. दोघांनाही केवळ सत्ता हवी आहे. बस्स !
    2014  साली लोकसभा निवडणुकींमध्ये काँग्रेसच्या झालेल्या दारूण पराभवानंतर पराभवाची कारण मिमांसा करण्यासाठी काँग्रेसने ए.के. अ‍ॅन्टोनी यांची एक सदस्यीय समिती नेमून चौकशी केली होती. या समितीने एक असा विनोदी निष्कर्ष काढला होता की, काँग्रेस हा  मुस्लिमांशी सहानुभूती राखणारा पक्ष असल्याचा जनतेने व्यापक समज करून घेतल्यामुळे पक्षाचा पराभव झाला. या निष्कर्षावर राहूल गांधींनी जरा जास्तच विश्‍वास ठेवला आणि काँग्रेसच्या मूळ धर्मनिरपेक्ष भावनेशी तडजोड करून सौम्य हिंदुत्वाचा अंगीकार केला. अ‍ॅन्टोनी समितीच्या निर्णयामुळेच नेहरूंपासून टोकन म्हणून एखाद दोन मुस्लिम नेते पदरी बाळगण्याच्या काँग्रेसच्या परंपरेला राहूल गांधी यांनी तिलांजली दिली. नेहरूंच्या जवळ जसे मौलाना अबुल कलाम आझाद होते, इंदिरा गांधीच्या जवळ जसे अब्दुल रहेमान अंतुले होते, राजीव गांधींच्या जवळ जसे गुलाम नबी आझाद होते, सोनिया गांधी जवळ जसे अहेमद पटेल आहेत, तसे राहूल गांधींजवळ कोणताही मुस्लिम नेता नाही. असे नाही की 20 कोटी मुस्लिमांमधून त्यांना एकही तरूण मुस्लिम नेता त्यांच्या विश्‍वासास पात्र मिळाला नाही. त्यांनी विचारपूर्वक आपले राजकीय सवंगडी निवडलेले आहेत व त्यात कुठलाही मुस्लिम नेता असणार नाही, याची दक्षता घेतलेली आहे.
    काँग्रेस नेतृत्व स्वत: गांधी घराण्यापुरते सीमित असल्याने इतर नेतृत्व महत्त्वाच्या राजकीय घराण्यांमधूनच येईल याची त्यांनी दक्षता घेतली होती. प्रत्येक राज्यात काँग्रेसने आपल्या दीर्घ सत्ता काळामध्ये अनेक राजकीय संस्थाने विकसित केली होती. सचिन पायलट हे राजस्थानातील राजेश पायलटचे वारस. ज्योतिरादित्य शिंदे हे मध्यप्रदेशातील माधवराव यांचे वारस. मिलिंद देवरा हे मुंबईच्या मुरली देवरा यांचे वारस. जितीन प्रसाद हे जितेंद्र प्रसाद या बड्या प्रस्थाचे वारस. मुंबईच्याच प्रिया दत्त सुनित दत्त यांच्या वारस. अशा एक ना अनेक संस्थानिक पुत्रांना काँग्रेसनी अनेक योग्य नेतृत्वक्षम कार्यकर्त्यांचा बळी देऊन पुढे आणले होते. त्यांच्यावर कमी वयात मोठ्या जबाबदार्‍या टाकल्या होत्या. ते ज्याला पात्र नव्हते तेवढा विश्‍वास त्यांच्यावर ठेवला होता. तोच कित्ता राहुल गांधी यांनी पुढे चालविलेला आहे. त्यांनी आपल्यासाठी निवडलेल्या चमुमधील दोन प्रमुख चेहरे होते. एक ज्योतिरादित्य सिंधीया तर दूसरे राजेश पायलट. पण म्हणतात ना दाढ जशी बाहेरील आजाराने पडत नाही तर आतून कीड लागल्याने पडते, तसेच राजकारणात मोठे नुकसान विरोधी पक्षाकडून होत नाही तर ते स्वपक्षियांकडूनच होते. मध्यप्रदेश आणि राजस्थानमध्ये असेच झाले. यात काँग्रेसच्या तोंडातील या दोन्ही दाढा आतील किडीमुळे पडल्या. जरी राजस्थानमध्ये सत्ता गेली नाही तरी पुरेशी शोभा झालेली आहे आणि काँग्रेसचे आमदार ’विक्रीयोग्य’ आहेत, असा संदेश देशात गेलेला आहे. घराणेशाही जपत त्यांनी ज्या अनेक संस्थानिक पुत्रांना आपल्या जवळ केले होते. त्यातील दोघांनी त्यांना अक्षश: हात दिला आहे. एक ज्योतिरादित्य सिंधीया  तर दूसरे राजेश पायलट. काँग्रेस आमदारांच्या व्याभिचारी निष्ठेचे ओंगळवाणे ताजे उदाहरण असे की, काँग्रेस म्हणून निवडून आलेल्या 12 आमदारांनी मध्यप्रदेशच्या भाजपच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान प्राप्त केलेले आहे. स्व: ज्योतिरादित्य शिंदे यांनी 22 जुलै 2020 रोजी भाजपच्या कोट्यातून राज्यसभेच्या खासदार पदाची शपथ घेतली आहे.
    असे अजिबात नाही की काँग्रेस आमदारांनी  राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्येच निष्ठाबदल केलेला आहे. यापूर्वी सुद्धा कर्नाटकसह अनेक राज्यात त्यांनी निष्ठा बदललेली आहे. आज परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की, आमदार निवडून आणण्याबरोबर त्यांना सांभाळून ठेवण्याची एक अतिरिक्त जबाबदारी काँग्रेस नेतृत्वावर येऊन पडलेली आहे.
    काँग्रेस स्व:ला धर्मनिरपेक्ष म्हणून घेते व त्याच कारणाने मुस्लिमांसह अनेक धर्मनिरपेक्ष हिंदूंची मते सुद्धा गोळा करते. पण ज्यांना जातीयवादी म्हटले जाते, अशा भाजपा बरोबर संसार थाटतांना या काँग्रेस आमदारांना मनाची नाही तरी मतदारांची सुद्धा लाज कशी वाटत नसेल, याचेच आश्‍चर्य वाटते. पक्ष आणि निष्ठा बदलून पुन्हा मतदारांना आपले तोंड कसे दाखवावे, याची त्यांना काळजी वाटत नाही. याचेच आश्‍चर्य वाटते. यामुळेच आमदारांनी निष्ठा बदलताच तो त्यांच्यावर विश्‍वास ठेवणार्‍या मतदारांचा विश्‍वासघात समजून त्यांच्यावर ठगबाजीची तरतूद असणारी सुधारणा कायद्यात करण्यात यावी, अशी ठकविल्या गेलेल्या मतदारांतून मागणी व्हावयास हवी.
    मुळात काँग्रेस नेतृत्व संभ्रमावस्थेत आहे. सोनिया गांधी निवृत्तीच्या फेजमध्ये असून, राहूल गांधींचे राजकारण ट्विटरच्या पुढे जात नाही. ट्विटरवरून केंद्र सरकार व नरेंद्र मोदींवर टिका करणे यालाच ते राजकारण समजतात की काय? अशी शंका यावी इथपर्यंत त्यांचे राजकारण खुजे वाटते ! सीएए आणि एनआरसीच्या मुद्यावर सारा देश ढवळून निघालेला असतांना ज्याप्रमाणे त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने मुस्लिमांना वार्‍यावर सोडून याबाबतीत सावध पावित्रा घेतला होता ते पाहता भविष्यात काँग्रेसला मत देण्यापूर्वी हजार वेळेस विचार करावा, अशी परिस्थिती निर्माण मुस्लिमांसमोर निर्माण झालेली आहे.
    भाजपा शासित केंद्र सरकार तीन देशातील मुस्लिम वगळून इतर नागरिकांना भारतीय नागरिकत्व देऊन ’कायद्यापुढे सर्व समान’ या घटनात्मक तरतुदीला हरताळ फासत असताना काँग्रेस सुभाषितवजा शब्दांतून सरकारचा शाब्दिक निषेध करत होते. देशातील वेगवेगळ्या विद्यापीठातील तरूण रस्त्यावर पोलिसांच्या लाठ्या खात असतांना काँग्रेसजन आपल्या वातानुकूलित बंगल्यांमधून बाहेर पडले नाहीत, हा कायम लक्षात ठेवण्याएवढा अपराध आहे.
    देशभरातील काँग्रेस नेते नरेंद्र मोदी आणि भाजपा यांना किती घाबरलेले आहेत हे त्यांच्या मौनातून ठळकपणे लक्षात येते. राहूल गांधी वगळता एकही काँग्रेसचा नेता मोदी आणि भाजपाच्या चुकीच्या धोरणावर कडाडून हल्ला चढवितांना दिसून येत नाही, याचे कारण त्यांनी पूर्वी केलेला भ्रष्टाचार हेच आहे. आज आपण मोदींवर टिका करावी आणि उद्या ईडीचे अधिकारी दारात उभे रहावेत हे आक्रीत पाहण्यापेक्षा, ”क्या भला तो चुप भला” या उक्तीप्रमाणे काँग्रेसचे समस्त नेते तोंडात मूग गिळून गप्प बसल्याचे पाहण्याचे दुर्भाग्य धर्मनिरपेक्ष जनतेच्या नशिबी आलेले आहे.     सतत सत्तेत राहिल्यामुळे विरोधी पक्षाला रस्त्यावर उतरून काम करावे लागते, हेच काँग्रेस नेतृत्व आणि कार्यकर्ते विसरून गेलेले आहेत. म्हणून केवळ साम, दाम, दंड, भेद वापरून स्व:च्या बळावर गेल्या दोन निवडणुकांपासून आमदार आणि खासदार निवडून येत आहेत. त्यांना निवडून आणण्यामध्ये राहूल गांधी आणि सोनिया गांधी यांची फारशी भूमिकाच उरलेली नाही. म्हणूनच हे स्वयंभू काँग्रेस नेते त्यांना भीत नाहीत आणि संधी मिळेल त्या पक्षात जावून निवडणुकीत टोपल्याने खर्च केलेला पैसा खोर्‍याने ओढावा हेच धोरण अंगीकारल्याने यापुढे सुद्धा काँग्रेसचे आमदार आणि खासदार भविष्यात फुटत राहतील व कपडे बदलल्याप्रमाणे आपली निष्ठा बदलतील आणि हे सर्व असहाय्यपणे राहूल गांधी पाहत राहतील, यात शंका नाही.

- एम.आय.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget