Halloween Costume ideas 2015

अल्अनआम : ईशवाणी (सुबोध कुरआन)

(९३) आणि त्या माणसापेक्षा मोठा अत्याचारी इतर कोण असेल जो अल्लाहवर खोटे कुभांड रचतो अथवा सांगतो की माझ्याकडे दिव्य प्रकटन आले आहे. खरे पाहता त्यांच्यावर कसलेही दिव्य प्रकटन अवतरले गेले नाही. अथवा जो अल्लाहच्या अवतरित केलेल्या ग्रंथाच्या विरोधात सांगत असेल की मीदेखील असा ग्रंथ अवतरवून दाखवीन? कदाचित! तुम्ही अत्याचाऱ्यांना अशा दशेत पाहिले असते जेव्हा ते मृत्यूच्या घरघरीत गटांगळ्या घेत असतील आणि दूत हात पुढे करून करून सांगत असतील, ‘‘आणा, काढा आपले प्राण, आज तुम्हाला त्या गोष्टींपायी अपमानजनक यातना दिली जाईल, ज्या तुम्ही अल्लाहवर दोषारोप करून हकनाक बरळत होता आणि त्याच्या संकेत-वचनांविरूद्ध उद्धटपणा करीत होता.’’
(९४) (आणि अल्लाह फर्मावील) ‘‘तर पाहा आता तुम्ही तसेच एकटे आमचे समोर हजर झालात जशा प्रकारे आम्ही तुम्हाला पहिल्यांदा एकाकी जन्माला घातले होते. जे काही आम्ही तुम्हाला जगांत दिले होते ते सर्व तुम्ही पाठीमागे सोडून आला आहात आणि आता आम्हाला तुमच्या-समवेत तुमची शिफारस करणारेदेखील दिसत नाहीत, ज्यांच्याबद्दल तुम्ही समजत होता की तुमचे कार्य सिद्धीस नेण्यात त्यांचाही काही वाटा आहे. तुमचे आपापसातील सर्व संबंध तुटले आणि ते सर्व तुमच्यापासून अलिप्त झालेले आहेत ज्यांचा तुम्ही अहंकार बाळगत होता!’’
(९५) दाणे आणि बीज काढणारा अल्लाह आहे.६२ तोच सजीवाला निर्जीवातून काढतो आणि तोच निर्जीवाला सजीवातून बाहेर काढणारा आहे.६३ ही सर्व कामे करणारा तर अल्लाहच आहे, मग तुम्ही कोठे भरकटले जात आहात?
(९६) रात्रीचे आवरण फाडून तोच प्रात:काळ करतो, त्यानेच रात्रीला विश्रांतीची वेळ बनविली आहे. त्यानेच चंद्र व सूर्याच्या उदय आणि अस्ताचे प्रमाण ठरविले आहे. हे सर्व त्याच प्रचंड सामथ्र्य व ज्ञान असणाऱ्याचे निश्चित केलेले अंदाज आहेत.
(९७) आणि तोच आहे ज्याने तुमच्यासाठी ताऱ्यांना वाळवंट व समुद्रातील अंधकारात मार्ग शोधण्याचे साधन बनविले. पाहा, आम्ही संकेत उघड करून सांगितले आहेत त्या लोकांसाठी की ज्यांना ज्ञान आहे.६४
(९८) आणि तोच आहे ज्याने एका जिवापासून तुम्हाला निर्माण केले६५ मग प्रत्येकासाठी एक विश्रामस्थान आहे आणि एक ती सुपूर्द केली जाण्याची जागा. हे संकेत आम्ही स्पष्ट केले आहेत, त्या लोकांसाठी जे बोध घेतात.६६
(९९) आणि तोच आहे ज्याने आकाशातून पाण्याचा वर्षाव केला मग त्याद्वारे सर्व प्रकारच्या वनस्पती उगविल्या. मग त्याद्वारे हिरवीगार शेते व झाडे उगविली, मग त्याच्यापासून थरावर थर असलेले दाणे काढले आणि खजुराच्या फुलोऱ्यांतून फळांचे घोसच्या घोस उत्पन्न केले जे ओझ्यापायी झुकले जात आहेत आणि द्राक्षे, जैतून (ऑलिव्ह) व डाळिंबाच्या बागा, ज्यांची फळे एक दुसऱ्याशी साम्य तर ठेवतात तरीसुद्धा त्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. या झाडांना जेव्हा फळे येतात तेव्हा फळे येण्याची व मग ती पिकण्याची प्रक्रिया जरा विचारपूर्वक पाहा, या गोष्टीत संकेत आहेत त्या लोकांसाठी जे श्रद्धा ठेवतात.
१००) यावरही लोकांनी ‘जिन्न’ना (अदृश्य निर्मितींना) अल्लाहचे भागीदार ठरविले.६७ वास्तविक पाहता तो त्यांचा निर्माता आहे. आणि न समजता उमजता त्याच्यासाठी पुत्र व कन्या ठरविल्या,६८ खरे पाहता तो पवित्र व उच्चतर आहे, त्या गोष्टीपासून ज्या हे लोक बोलतात.


६२)    म्हणजे भूगर्भातून बीजाला फाडून त्यातून झाडाचा अंकूर काढणारा.
६३)    निर्जीवापासून सजीवाला काढणे म्हणजे निर्जीवापासून सजीव प्राण्यांना निर्माण करणे. सजीवापासून निर्जीवाला काढण्याचा अर्थ आहे सजीव शरीरातून निर्जीव पदार्थाला काढणे.
६४)    म्हणजे या सत्याचे पुरावे की अल्लाह एकमेव आहे, दुसरा कोणीच ईशत्वाचे गुण ठेवत नाही की ईशत्वाच्या अधिकारातही भागीदार नाही. तसेच ईशत्वाच्या हक्कांपैकी एकही हक्काचा अधिकार नाही. परंतु त्या निशाण्या पाहून वास्तविकतेपर्यंत पोहोचणे अज्ञानी लोकांच्या आवाक्याबाहेरील गोष्ट आहे. त्या मौलिकतेचा लाभ त्याच लोकांना प्राप्त् होऊ शकतो जे वैज्ञानिक दृष्टीने सृष्टीतील पुराव्यांचे अवलोकन करतात.
६५)    म्हणजे मानवी वंशाची सुरुवात एकाच जीवापासून (व्यक्ती) केली आहे.
६६)    म्हणजे मानवजातीचा जन्म आणि त्यात स्त्री पुरुषाचे फरक व प्रजनन प्रक्रियाद्वारे त्याची वृद्धी, तसेच आईच्या गर्भाशयात गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंतच्या जीवनयात्रेतील विविध टप्प्यांवर नजर टाकली तर त्यात असंख्य स्पष्ट निशाण्या माणसाच्या समोर येतात. त्या निशाण्यांद्वारे तो वर नमूद केलेले तथ्य सहज जाणून घेऊ शकतो. परंतु या निशाण्यांपासून बोध तेच लोक घेऊ शकतात जे चिंतन मनन करतात. जनावरांसारखे जीवन व्यतीत करणारे जे आपल्या मनोकामनांना पूर्ण करण्यातच धन्यता मानतात, असे लोक या निशाण्यांपासून काहीच बोध घेऊ शकत नाहीत.
६७)    म्हणजे अनुमानाने आणि भ्रमाने हा निष्कर्ष काढला की सृष्टीव्यवस्थेत आणि मनुष्याचे भाग्य बनविणे आणि बिघडविणे यासाठी अल्लाहसमवेत दुसऱ्या अदृश्य शक्तीसुद्धा सामील आहेत. कोणी पर्जन्यदेवता आहे, तर कोणी जन्म घालणारा देव तर कोणी पालनपोषण करणारा देव आहे. कोणी धनाची देवता आहे तर कोणी आरोग्यदेवता आहे. अशाप्रकारच्या अंधश्रद्धा जगाच्या सर्व अनेकेश्वरवादी लोकसमुदायांत आत्मा, शैतान, राक्षस, देवी-देवता इ. विषयी आढळतात.
६८)    अरबचे अज्ञानी लोक फरिश्त्यांना (देवदूतांना) अल्लाहच्या मुली म्हणत होते. अशाप्रकारे जगातील अनेकेश्वरवादी लोकांनी अल्लाहची भ्रामक वंशावळ निर्माण केली. नंतर देवीदेवतांची एक पूर्ण वंशावळ आपल्या मनानेच तयार करून टाकली.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget