Halloween Costume ideas 2015

‘इंडिया अर्थात भारत' हिन्दुस्तान नाही!

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत देश स्वतंत्र झाला. हा देश इंग्रजांच्या तावडीतून मुक्त झाल्यानंतर कसा चालणार. या देशाची उद्दिष्टे, ध्येय धोरणे काय असणार यासाठी संविधान सभेची  निर्मिती करण्यात आली. ९ डिसेंबर १९४६ रोजी स्वतंत्र भारताच्या संविधान निर्मितीच्या कार्याला प्रारंभ केला. या संविधान समितीचे मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांची निवड करण्यात आली. भारतीय संविधानाचे कामकाज ९ डिसेंबर १९४६ रोजी प्रारंभ करण्यात आले. हे संविधान पूर्ण होण्यास दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस लागले.  यासाठी बाबासाहेब डॉ आंबेडकर यांनी अथक परिश्रम घेतले आणि जगातील सर्वात मोठे व सर्वात श्रेष्ठ असे भारतीय संविधान निर्माण केले.
या भारतीय संविधानातील पहिल्या भागात संघ राज्य व त्याचे राज्यक्षेत्र यात अनुच्छेद क्रमांक एक मधे संघराज्याचे नाव हे ‘इंडिया अर्थात भारत’ हा राज्यांचा संघ असेल असे  नमूद  केले आहे. पण तरीसुद्धा या देशातील काही लोक विशेषत: मुस्लिम बांधव ‘इंडिया किंवा भारत’ असे न म्हणता या देशाला लागू न होणारे नाव 'हिन्दुस्तान' या नावाचा वारंवार उच्चार  करतात. तो त्यांनी करु नये. कारण जर हिन्दुस्तान या शब्दाचा अर्थ हिंदू ± स्थान अर्थात 'हिंदू' म्हणजे हिंदू धर्माचे लोक. स्थान म्हणजेच प्रदेश किंवा प्रदेशात वास्तव्य करणारे लोक.  याचाच अर्थ असा होतो की या देशात एकाच धर्माचे लोक राहतात इतर दुसऱ्या धर्माचे लोक राहत नाही. परंतु भारतामध्ये इतरही अनेक धर्माचे लोक राहतात. मग त्यांचे काय?
डॉ. राजबली पान्डेय लिखित हिंदुधर्मकोष या ग्रंथात पान क्र. ७०२-७०३ वर लिहितात 'हिंदु’ हा शब्द भारतीय इतिहासात फार आर्वाचीन आणि विदेशी आहे. प्राचीन संस्कृत साहित्यात  याचा कोठेही प्रयोग केलेला आढळत नाही. फारशी भाषेत हिंदु या शब्दाबद्दल अत्यंत घृणास्पद अर्थ पहायला मिळतो. तसेच हिंदु हा शब्द मुघलांनी भारतीयांसाठी उपयोगात आणला आहे.  तो आपण गुगल या सर्च इंजिन वरही सर्च करु शकतो. ज्याला खात्री करून घ्यावयाची आहे त्यांनी तो जरुर शोधावा. असे माहिती असताना सुद्धा ब्राह्मणांनी त्यांचा स्वार्थ साधण्यासाठी  तो शब्द उपयोगात आणला आहे. खरे पाहिले तर मुस्लिम व इतर धार्मिक समूहाला वेगळे पाडण्यासाठी या संकल्पनेचा उपयोग ब्राह्मणी प्रवृत्तीचे लोक मोठ्या प्रमाणात करतात. भारत  हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. तरी रोजच्या व्यवहारामधे या देशातील ब्राह्मणांची आर.एस.एस. सारखी संघटना ‘हिन्दुत्वाच्या’ विषारी प्रयोगाद्वरे इतर सर्व धार्मिक अल्पसंख्याक समूहांना  आपल्या अंकित ठेवण्याचे प्रयत्न करते आहे. यासाठी त्याला हिन्दुस्तान ही संकल्पना उपयोगी ठरते. स्वत:ला हिंदु म्हणवून घेणारा इतर मागास जातीतील समूह मुस्लिमांच्या विरोधात  एकाच वेळेला वापरणे ‘हिन्दुस्तान’ अशा संकल्पनेमुळे शक्य होते. आमच्या मुस्लिम बांधवांकडूनही अज्ञानातून किंवा पारंपरिक भावनेतून ‘हिंदुस्तान’ या शब्दाचा वापर होतो. हे  आर.एस.एस.सारख्या ब्राह्मणाच्या नेहमीच पथ्यावर पडलेले आहे. भारताला हिंदुस्तान असे संबोधने ही तर भारतीय संविधानाची पायमल्ली आहे, असे मला वाटते. आंबेडकरी जन समूह  भारत किंवा इंडिया या शब्दाला पर्याय देण्याच्या नेहमीच विरोधात राहतो. वेळेप्रसंगी हा समूह ‘भारत किंवा इंडिया’ यासाठी संविधान विरोधी लोकांच्या विरोधात संघर्षाचा पवित्रा घेतात.  आंबेडकरी समूह हा केवळ ‘भारत किंवा इंडिया’ या संकल्पनेशी केवळ भावनिक रित्या जुळला आहे असे नाही तर त्याला याद्वारे या देशाचा गौरव शाली इतिहास ही जपायचा आहे.
इंडिया हे नाव ‘इंडस’ या नदीवरुन पडले आहे. परंतु येथील मनुवादी ब्राह्मणवादी संशोधकांनी वास्तवात नसलेल्या सिंधु नदीचा शोध लावून इतिहासाला अपयशी पर्याय देण्याचा प्रयत्न  केला आहे. जगाच्या इतिहासात ‘इंडस सिविलायझेशन’ (इंडस सभ्यता) विषयी अतिशय गौरवपूर्ण व वैभवशाली उल्लेख सापडतो जो आजही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. इंडस काळातील सभ्यता व मानवाचा समतोल विकास आजच्या आधुनिक जगातही आपण निर्माण करु शकलो नाही. अशावेळी जाती-धर्मावर आधारित समाज व्यवस्थेला गाडून समताधिष्टित  समाजनिर्मितीसाठी आमच्या पुढे संविधान निर्मात्याने भारतीय संविधानाच्या माध्यमातून ‘इंडिया अर्थात भारत’ हीच ओळख ठेवलेली आहे. ज्याचा आंबेडकरी जनता व सर्व भारतीय आदरपुर्वक स्वीकार करते.
भारत हा शब्द ‘भा+रत’ असा तयार होतो. ‘भा’ म्हणजे ‘ज्ञान’ तर ‘रत’ म्हणजे ‘सदा संलग्न’ अर्थात ज्ञान निर्माणाच्या प्रक्रियेत सद संलग्नित असणारा समूह किंवा देश असा त्याचा  अर्थ स्पष्ट होतो. जो आमच्या प्राचीन काळातील नालंदा, तक्षशीला, विक्रमशिला अशा अनेक प्राचीन जागतिक विश्व विद्यापीठांची आठवण करून देतो. अशी आदर्श व सन्मानजनक  ओळख भारतीय संविधान निर्मात्यांनी स्वीकारुन भारतीय जनतेपुढे ज्ञानाचा एक आदर्श उभा केला आहे. तसेच या देशाला हिन्दुस्तान असे संबोधून मुस्लिम बांधवांना काहीही फायदा होत  नाही. जर काही फायदा होत असेल तर त्यांनी त्याचा उच्चार अवश्य करावा त्यावर चिंतन मनन करावे. याऐवजी ‘इंडिया किंवा भारत’ या नावाचा उच्चार व प्रचार आणि प्रसार करावा.  इतरांनाही तसे करण्यास प्रोत्साहीत करावे.

-सिद्धार्थ पवार (स्वतंत्र पत्रकार),
जालना. मो.-९१७२५३४४२४

Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget