Halloween Costume ideas 2015

बीएचयूमधील वाद लोकशाहीसाठी घातक

BHU
बदले-बदले मेरे सरकार नजर आते हैं
घर की बरबादी के आसार नजर आते हैं
जमाअते इस्लामीचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी यांनी हैद्राबाद येथून प्रकाशित होणार्‍या एका मासिकामध्ये वंशवादाच्या वाईट परिणामांबद्दल लिहितांना एक जबरदस्त घटना नमूद केली होती. ती अशी की, ”मुस्लिम लीगच्या एका मोठ्या नेत्याने त्यांच्याकडे तक्रार केली की, मुंबई आणि कलकत्ता येथील श्रीमंत मुस्लिम पुरूष अँग्लो इंडिशन वेश्यांकडे का जातात? त्यांच्या कृपादृष्टीसाठी पात्र तर मुस्लिम वेश्या आहेत.” (संदर्भ : मासिक तर्जुमानुल कुरआन, फेब्रुवारी 1941 पान क्रं. 15).
    वंशवादी माणसं अंतर्विरोधाने भरलेली असतात. ते सत्याची साथ त्याचवेळी देवू शकतात ज्यावेळी सत्य त्यांच्या वंशाच्या बाजूने असेल. म्हणूनच आपल्या वंशाच्या विरूद्ध जावून ते इतर वंशाच्या लोकांबरोबर न्याय करूच शकत नाहीत.  ही जगातील प्रत्येक वंशवादी समुहाची मानसिकता आहे. भारतामध्ये तर जातीव्यवस्थेमुळे ही मानसिकता लोकांमध्ये खोलपर्यंत रूजलेली आहे. अशा लोकांचा दृष्टीकोण वंशापुरताच संकुचित असतो, म्हणूनच अल्लाहने मानवजातीला वंश, जात आणि राष्ट्राच्या पुढे जावून मानवतेच्या आधारावर न्याय करण्याचा आदेश दिलेला आहे. कुरआनमध्ये स्पष्टपणे म्हटलेले आहे की,     “लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरूष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकत: अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्‍चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.” (सुरे अलहुजरात आयत नं.13).
    हजच्या काळामध्ये या आयातीचे प्रात्याक्षिक याची देही याची डोळा पाहता येते. जगातील वेगवेगळ्या देशाचे, वंशाचे आणि भाषेचे लोक एकाच    रांगेमध्ये खांद्याला खांदा लावून नमाजसाठी उभे असतात. ते एकमेकांना ओळखत नाहीत. त्यांना एकमेकांची भाषा समजत नाही. तरीपण सगळ्यांच्या मनामध्ये हाच भाव असतो की आम्ही एका आई-वडिलांची लेकरे आहोत. मानवतेचा एवढा मोठा प्रत्यक्ष आविष्कार जगात दूसरा कोणताच नाही.
    ही प्रस्तावना यासाठी लिहावी लागली की मागच्या आठवड्यात बीएचयू अर्थात बनारस हिंदू विद्यापीठामध्ये एका मुस्लिम प्राध्यापकाच्या नियुक्तीमुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठ डोक्यावर घेतले होते.
घटनेचे संक्षिप्त वर्णन
    थोडक्यात घटना अशी आहे की, फेरोजखान नावाच्या एका युवकाची बीएचयूच्या ’संस्कृत विद्याधर्म विज्ञान संकाय’ या शाखेच्या ’साहित्य’ विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. 5 नोव्हेंबरला त्यांची मुलाखत घेण्यात आली. 6 नोव्हेंबरला त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 7 नोव्हेंबरला ते कर्तव्यावर हजर होण्यासाठी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दाखल झाले. त्यांच्या पोहोचण्याच्या अगोदरच कॅम्पसमध्ये संस्कृत विभागाच्या विद्यार्थ्यानी संप पुकारला होता. ते त्यांच्या नियुक्तीचा विरोध करत होते. त्यांचे असे म्हणणे होते की, ”दुसर्‍या कुठल्या एका विभागामध्ये त्यांची नियुक्ती केली गेली असती तर त्यांना काही अडचण नव्हती. मात्र संस्कृत विभाग, त्यातही विद्याधर्म संकायमध्ये त्यांची नियुक्ती कदापीही सहन केली जावू शकत नाही. आम्ही एका मुस्लिम व्यक्तीकडून सनातन हिंदू धर्माचे शिक्षण कसे घेणार?”
    फेरोज खान विरोधी आंदोलनाचे नेते चक्रपाणी ओझा यांनी तर एक पाऊल पुढे जावून असे म्हटले आहे की, ”या विभागामध्ये सनातन हिंदू व्यक्तीचीच नियुक्ती व्हावी, अशी तरतूद विद्यापीठाच्या कायद्यातच आहे.” पण हे सांगत असताना हे सत्य ते विसरून जातात की, विद्यापीठाचा हा कायदा देशाच्या राज्यघटनेपेक्षा श्रेष्ठ नाही. त्यातल्या त्यात फेरोज खान यांची नियुक्ती वैधरित्या झालेली आहे. सुरूवातीला विद्यापीठाने या पदाची जाहिरात काढली. उत्तरादाखल 10 लोकांचे आवेदनपत्र आले. त्यांच्या मुलाखती झाल्या. मुलाखती घेणार्‍यांमध्ये संस्कृत विभागप्रमुख आणि दोन ज्येष्ठ प्राध्यापक सामील होते. त्या सर्वांनी 10 लोकांच्या मुलाखती घेतल्या आणि फेरोजखान हे सर्वोत्कृष्ट असल्यामुळे त्यांची निवड करण्यात आली. अशा परिस्थितीत विद्यापीठ कायद्याच्या तरतुदींची माहिती निवड समितीला नव्हती, असे म्हणणे हास्यास्पद आहे.
फेरोज खान कोण आहेत?
    फेरोज खान हे मूळचे राजस्थानचे. जयपूरपासून 36 किलोमीटर लांब असलेल्या बागरू नावाच्या गावाचे राहणारे. त्यांचे वडील रमजान खान संगीतकार असून, भजन गायक म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. एका ज्योतिषाच्या सल्ल्यावरून त्यांनी आपले नाव रमजान खान बदलून मुन्ना मास्टर ठेवले होते. फेरोज खान मुन्ना मास्टरचे तिसरे अपत्य. त्यांना लहानपणापासूनच संस्कृतचे आकर्षण होते. विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात शिकविला जाणारा लांबलचक ’प्रकाश-पर्व’ त्यांना पूर्णपणे तोंडपाठ आहे. त्यांची संस्कृत भाषेच्या व्याकरणाची समजही उत्कृष्ट आहे. ते संस्कृतमध्ये कविता लिहितात. एवढेच नव्हे तर दूरदर्शनावरील  साप्ताहिक कार्यक्रम ’वार्तावाणी’चे ते प्रस्तुतकर्तेही आहेत. स्वत:बद्दल त्यांचे असे मत आहे की, संस्कृत विषयी त्यांना अपार प्रेम असून, या भाषेचे सर्व बारकावे त्यांना माहिती आहेत. त्यांच्या या सर्वगुणांचा एकत्रित विचार करूनच राजस्थान सरकारने त्यांचा ’संस्कृत विद्वान’ हा पुरस्कार, मुख्यमंत्री अशोक गहेलोत यांच्या हस्ते देवून गौरव केला आहे. 
    एवढी चमकदार प्रोफाईल असल्या कारणानेच निवड समितीने त्यांची निवड केली, जी की उचितच होती. मात्र ब्राह्मण वंशश्रेष्ठत्व वादाने ग्रस्त, संकुचित मानसिकतेच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा जो विरोध केला आहे तो दुर्दैवी आहे. हीच ती मानसिकता आहे जी कधीकाळी भारताच्या फाळणीसाठी कारणीभूत ठरली होती. आश्‍चर्याची गोष्ट तर ही आहे की, राष्ट्रवादाच्या भावनेचे ठेकेदार असलेले काही लोक मदरसे आणि त्यात शिकणार्‍या विद्यार्थ्यांचा विरोध करतात आणि हेच ठेकेदार संस्कृत पाठशालेतून संस्कृत भाषेचे शिक्षण ग्रहण करणार्‍या फेरोज खानचाही विरोध करतात. म्हणजे यांचा मुस्लिम विद्यार्थ्यांनी मदरश्यामध्ये शिक्षण घेण्यालाही विरोध आहे आणि संस्कृत पाठशालेमध्ये शिक्षण घेणार्‍यालाही विरोध आहे. अशा परिस्थितीत मुस्लिमांनी जावे तर कोठे जावे?
    बीएचयूच्या विद्यार्थ्यांनी फेरोज खानच्या केलेल्या विवेकशुन्य विरोधामुळे भारताच्या गंगा-जमनी संस्कृतीचे काय होणार? असा सहज प्रश्‍न मनामध्ये येतो. अशावेळी गुलजार यांचे ते प्रसिद्ध वाक्य आठवते की, ”इंग्रजांच्या विरूद्ध लढतांना आम्ही सर्व हिंदुस्थानी होतो मात्र स्वतंत्र झाल्यानंतर हिंदू आणि मुसलमान झालो.”
    मॉब लिंचिंग, नियमित होणार्‍या मुस्लिम विरोधी दंगली, पावलो पावली होणारा भेदभाव आणि आता संस्कृत शिकण्यालाही विरोध, अशा परिस्थितीत 20 कोटी मुस्लिमांच्या मनामध्ये असा प्रश्‍न उत्पन्न होणे स्वाभाविकच म्हणावे लागेल की, त्यांच्या पूर्वजांनी भारतामध्ये राहण्याचा निर्णय घेवून चूक तर केली नाही? याचे उत्तर बहुसंख्य समाजबंधूंना द्यावे लागेल.
    फेरोजखान यांच्या नियुक्तीच्या विरोधाला विद्यापीठ प्रशासनाने फक्त फेटाळून लावून जमणार नाही तर विरोध करणार्‍यांविरूद्ध कडक कायदेशीर कारवाई लागेल. अन्यथा हे विद्यार्थी जर आपल्या या आंदोलनात यशस्वी झाले आणि विद्यापीठाने फेरोजखान यांची नियुक्ती रद्द केली तर मग भविष्यात अशा अनेक प्रश्‍नांना विद्यापीठाला तोंड द्यावे लागेल. आंबेडकरवादी म्हणतील की, आंबेडकरी साहित्य शिकविण्याचा अधिकार फक्त मागासवर्गीय प्राध्यापकालाच असावा. साम्यवाद शिकणारे विद्यार्थी म्हणतील की साम्यवाद शिकविण्याचा अधिकार फक्त नास्तीकालाच असावा. असे जर झाले तर शिक्षण किती विभागामध्ये विभागून जाईल हे सांगता येणे कठीण आहे.
बीएचयूचा इतिहास
    मुळात बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना प्रसिद्ध हिंदू विचारक पंडित मदनमोहन मालवीय यांनी 1916 मध्ये केली. 26 नोव्हेंबर 1950 ला राज्यघटनेचा स्वीकार झाल्यानंतर या विद्यापीठाचे रूपांतर केंद्रीय विद्यापीठात झाले. तेव्हापासून हे विद्यापीठ सरकारी खर्चावर चालते. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या  नावामध्ये असलेल्या ’मुस्लिम’ या शब्दला विरोध करणार्‍यांनी लक्षात घ्यावे की, बनारस हिंदू विद्यापीठाच्या नावामध्ये फक्त ’हिंदू’ हा शब्दच नाही तर त्या ठिकाणी सनातन हिंदू धर्म तसेच ज्योतिष सारखे विषय सुद्धा सरकारी खर्चावर शिकविले जातात.
राष्ट्रविघातक विचार
    सहाय्यक प्राध्यापक फेरोज खान यांच्या नियुक्तीला विरोध ही काही सामान्य बाब नाही. यामध्ये विभाजनवादी मानसिकता दडलेली आहे, जी की देशाच्या एकात्मतेसाठी घातक आहे. विद्यापीठ प्रशासनाने जर आंदोलक विद्यार्थ्यांसमोर गुडघे टेकले तर यापेक्षा वाईट, राष्ट्रविरोधी कृत्य दूसरे कोणते असू शकेल?
    संस्कृत भाषेवर प्रेम करणारे फेरोज खान एकटे नाहीत तर देशातील अनेक विद्यालयांमध्ये मुस्लिम हे संस्कृत शिकतात आणि शिकवितात तर दूसरीकडे अनेक हिंदू असे आहेत जे उर्दू शिकतात आणि शिकवितात. संस्कृत आणि उर्दू या दोन्ही शुद्ध भारतीय भाषा असून, दोहोंचा समावेश राज्य घटनेमध्ये मान्यता प्राप्त भाषेच्या यादीमध्ये आहे. उर्दूला समृद्ध करण्यामध्ये तर प्रेमचंद, दुष्यंतकुमार, कुंवर महेंद्रसिंग बेदी, नारायण मुल्ला पासून राजेश रेड्डी पर्यंत अनेक लोकांनी मोठा सहभाग नोंदविलेला आहे. जर कृष्ण बिहारी ’नूर’ यांना उर्दू शिकण्यापासून रोखले गेले असते तर -
ईश्क हो जाए किसीसे कोई चारा तो नहीं
मुहम्मद (सल्ल.) पे किसी मुस्लिम का इजारा तो नहीं
    सारखा ऐतिहासिक शेर त्यांनी लिहिला नसता. संस्कृत शिकविण्यासाठी झालेल्या मुस्लिम प्राध्यापकाच्या नियुक्तीचा विवेकशुन्य विरोध करून बनारसवाल्यांनी भारताच्या उज्ज्वल परंपरेचा अपमान केलेला आहे. एवढेच नव्हे तर दस्तुरखुद्द बनारसमधील भारतरत्न बिस्मील्ला खान यांचाही अपमान केलेला आहे. त्यांना कळायला हवे होते की, आजही देशभरातील बहुसंख्य हिंदू समाजातील कुठलेही शुभकार्य बिस्मील्लाखान यांच्या रेकॉर्डेड शहनाई वादनाशिवाय पूर्ण होत नाही. ”बडी देर भई नंदलाला, तेरी राह तके ब्रिजबाला” सारखे अनेक दर्जेदार भजन गाणारे मुहम्मद रफी यांना मग हे संकुचित विचार करणारे लोक कोणत्या कप्प्यात ठेवतील? आपल्या देशाला अग्नी, पृथ्वी, नाग, पिनाक सारखे दर्जेदार मिसाईल देऊन संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर बनविणार्‍या आणि परमाणू सक्षम बनविण्यामध्ये बहुमुल्य योगदान देणार्‍या एपीजे अब्दुल कलाम यांना हे लोक कोणत्या कप्प्यात ठेवतील? शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये जर अशा संकुचित मनोवृत्तीला उत्तेजन मिळाले तर बाकी जाती-धर्मातील हुशार विद्यार्थ्यांवर अन्याय होईल, ते पुढे येवूच शकणार नाहीत. ज्यामुळे देशाचे कधीही न भरून निघणारे नुकसान होईल.
    समाधानाची बाब एकच आहे की, हा लेख लिहिपर्यंत तरी विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापक फेरोजखान यांची नियुक्ती रद्द केलेली नव्हती. मात्र जीवाच्या भीतीने फेरोजखान हे गावी निघून गेले असून, त्यांनी त्यांचा भ्रमणध्वनीही बंद करून ठेवला आहे. मुळात या मानसिकतेचे जनक लालकृष्ण आडवाणी होत. 1989 साली त्यांनी जी रथयात्रा सुरू केली होती तेव्हाच हिंदू आणि मुस्लिम समाजाच्या मानसिक विभाजनाचा पाया रचला गेला होता. पुढे वर्षागणिक या भावनेमध्ये वाढच होत गेलेली आहे. आडवाणी यांच्यासारख्या सत्तेसाठी देशहिताला नजरेआड करणार्‍या राजकारण्यांच्या राजकारणाला पाहून असे म्हणावे वाटते की,
    इस राज को एक मर्दे फिरंगी ने किया फाश
    हर चंद की दाना इसे खोला नहीं करते
        जम्हुरीयत इक तर्जे हुकूमत है की जिसमें
        बंदों को गिना करते हैं तोला नहीं करते.

    शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की, ऐ अल्लाह ! आमच्या या महान देशाचे रक्षण अशा संकुचित वृत्ती असलेल्या सर्व समाजातील लोकांपासून कर. आमीन.

- एम.आय. शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget