Halloween Costume ideas 2015

इस्लामोफोबिया : कारणे आणि उपाय

उनका जो फर्ज है वो अहले सियासत जानें
मेरा पैगाम मुहब्बत है जहाँ तक पहूंचे
फोबिया म्हणजे भीती. सर्वांनाच कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. कोणाला झुरळाची तर कोणाला पालीची, कोणाला उंचीची तर कोणाला पाण्याची भीती वाटत असते. याच भीतीला शास्त्रीय भाषेत फोबिया म्हणतात. पण अलिकडे काहीलोकांना इस्लामची भीती वाटत आहे. थोडक्यात सांगावयाचे म्हणजे इस्लामोफोबिया म्हणजे इस्लाम किंवा मुस्लिमांविषयी वाटणारी भीती. आता ही भीती खरी की खोटी? ती कशी निर्माण केली जाते? आणि ती घालविण्यासाठी मुस्लिमांना कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? यावर आपण आज चर्चा करणार आहोत.

इस्लामविषयी भीती का निर्माण केली जाते
इस्लाम एक धर्म जरी असला तरी इस्लामची भीती दाखविण्याचे कारण धार्मिक नसून आर्थिक आहे. जगामध्ये दोन प्रकारच्या अर्थव्यवस्था अस्तित्वात होत्या. एक साम्यवादी दूसरी भांडवलवादी. 1991 साली सोव्हियत रशियाच्या विघटनाबरोबर साम्यवादी व्यवस्थेचेही विघटन झाले. आजमितीला जगातील कुठल्याच देशात साम्यवादी अर्थव्यवस्था अस्तित्वात नाही. रशिया आणि चीनमध्ये सुद्धा नाही. शीत युद्धानंतर ’न्यू वर्ल्ड ऑर्डर ’ अंतर्गत भांडवलशाही अर्थव्यवस्था जगाच्या प्रत्येक देशात अस्तित्वात आली आहे. मात्र ही व्यवस्था शोषणवादी असल्याने तिचे दुष्परिणामही जाणवू लागले आहेत.
    व्याज हा या अर्थव्यवस्थेचा पाया असल्यामुळे यात गरजू लोकांचे शोषण अगदी त्यांच्या मर्जीने केले जाते. गरजवंत कर्ज घेतात आणि ते फेडण्यासाठी नवीन कर्ज घेतात आणि कर्ज फेडत-फेडत मरून जातात. श्रीमंतांची संपत्ती फारसे प्रयत्न न करता वाढत जाते तर गरीबांची संपत्ती सर्व प्रयत्न करूनही कमी होत जाते. या व्यवस्थेत व्याजामुळे श्रीमंत लोक अधिक श्रीमंत तर गरीब लोक अधिक गरीब होत जातात. या व्यवस्थेचे चटके सहन न झाल्याने आजपर्यंत लाखो लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत, अनेक लोक करीत आहेत व ही व्यवस्था अशीच चालू राहीली तर अनेक लोक करतील, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे असे समजून चला.
    याला पर्याय काय?
    ह्या शोषणावर आधारित अर्थव्यवस्थेला व्याजविरहित इस्लामी अर्थव्यवस्था हाच समर्थ पर्याय बनू शकतो. असा प्रबळ विचार विसाव्या शतकात कवी इक्बाल, मौलाना सय्यद अबुल आला मौदूदी, हसन अल बना आणि सय्यद कुतूब शहीद इत्यादी विचारवंतांनी मांडला. तो विचार बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचू नये व लोकप्रिय होवू नये, यासाठी इस्लामच्या बदनामीची मोहिम आखण्यात आली. मात्र अलिकडे युरोप आणि अमेरिकेमध्ये इस्लामी अर्थव्यवस्थेचे आकर्षण वाढले असून, अनेक बँकांमध्ये व्याजविरहित बँकिंग व्यवहाराचे वेगळे काऊंटर सुरू करण्यात आलेले आहे. या व्यवस्थेवर अनेक पुस्तके लिहिली गेलेली आहेत आणि लिहिली जात आहेत, संशोधन सुरू आहे. एकदा का हा विचार एक व्यवस्था म्हणून मांडण्यात आला आणि लोकप्रिय झाला तर भांडवलशाहीचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही व आपल्या डोळ्यादेखत आपल्या व्यवस्थेचे धिंडवडे निघतील. या भितीतून इस्लाम विषयी मुद्दामहून भितीदायक वातावरण निर्माण केले जात आहे. इस्लामोफोबिया पसरविण्याचे हे एकमेव कारण आहे.
इस्लाम धर्म आणि व्यवस्था दोन्ही आहे
    इस्लाम धर्म म्हणून सर्वांना मान्य आहे मात्र व्यवस्था म्हणून कोणालाच मान्य नाही. अगदी मुस्लिम देशांनाही नाही. कारण हा खरा समतावादी धर्म असून बिनव्याजी अर्थव्यवस्था ही त्या व्यवस्थेचा एक भाग आहे. ही अर्थव्यवस्था एखाद्या देशात स्थापित झाली व जनतेला आवडू लागली, तिचे सकारात्मक परिणाम दिसू लागले, लोक आनंदाने जगू लागले, गरीबी दूर झाली, लोकं सुखी झाली तर मग उद्योगपतींना स्वस्तात मजूर कोठून मिळतील? व्याजाद्वारे येणारा फुकटचा पैसा कसा येईल? ही भीती मुस्लिम देशांसह सर्व भांडवलशाही प्रधान देशांना आहे. म्हणूनच इस्लामोफोबियाचा जन्म झालेला आहे. याच भितीतून अगदी पाश्‍चिमात्य लोकशाही पद्धतीने म्हणजे बॅलेट पेपरवर निवडणुका होवून निवडून आलेले इस्लामप्रिय सरकारे सुद्धा पाडली जातात. याचे ताजे उदाहरण इजिप्त आहे. इजीप्तच्या तहेरीर चौकामधील आंदोलनानंतर मुहम्मद मोर्सी हे 51 टक्के मतं घेऊन जनतेतून सरळ निवडून आले होते. केवळ ते इस्लामी अर्थव्यवस्थेचे पक्षधर होते म्हणून इजिप्तच्या सेनेचा प्रमुख अब्दुल फतेह अलसिसी याला हाताशी धरून अमेरिकेने इजराईलच्या मदतीने मोर्सी यांचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार उलथवून तेथे लष्करशाही आणलेली आहे. यापूर्वीही अलजेरिया आणि पॅलेस्टिनमध्ये लोकांतून निवडून आलेल्या इस्लामवादी पक्षांच्या लोकांना सरकार चालवू देण्यात आले नाही. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की एखाद्याला ’डिफिट’ करता येत नसेल तर त्याला ’डिफेम’ करा. अर्थात ज्याला पराजित करता येत नाही त्याला बदनाम करा.
    1441 वर्षापूर्वी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी ज्या कल्याणकारी, समतामूलक, आदर्श समाजरचनेसाठीचे आंदोलन सुरू केले होते, त्याला तेव्हा जो विरोध झाला होता तो ही आर्थिकच होता व आज 21 व्या शतकात जो विरोध होत आहे, तो ही आर्थिकच आहे. इस्लामने त्यावेळीही मक्का शहराच्या व्याजाधारित अर्थव्यवस्थेला जे आव्हान दिले होते तेच आजही कायम आहे. ते अरबस्थानामध्ये जसे यशस्वी झाले तसे आज ना उद्या जगात इतरत्रही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. ही भीती भांडवलशाही समर्थकांना वाटत आहे म्हणून, ’व्याजमुक्त अर्थव्यवस्थेचे फायदे’ या विषयावर कधीच कुठल्या वाहिनीवर चर्चा झालेली वाचकांना आठवत नसेल. 

    साम्यवादी अर्थव्यवस्थेचा पाडाव
    कार्ल मार्क्सच्या आर्थिक समतेच्या विचाराने भारावून 1917 साली रशियामध्ये राजकीय क्रांती झाली आणि युएसएसआर नावाची एक महासत्ता उदयाला आली. पुढे 1959 मध्ये चीनमध्ये याच क्रांतीने चीनच्या राजकीय पटलाचा ताबा घेतला. याशिवाय, हंगेरी, लावोस, क्युबा, व्हिएतनाम सारखे इतर छोटे-छोटे राष्ट्र आर्थिक समतेवर आधारित साम्यवादी राजकीय व्यवस्थेखाली आले. परंतु कार्ल मार्क्सचा हा विचार कृत्रिम होता, म्हणून 1991 साली तो जगाच्या राजकीय पटलावरून नाहीसा झाला. युएसएसआरचे विघटन झाले आणि अनेक देश स्वतंत्र झाले व त्यांनीही भांडवलशाहीची वाट चोखाळली. साम्यवादाच्या या पाडावानंतर आता अमेरिकेपुढे इस्लामी अर्थव्यवस्थेचे एकमेव आव्हान उभे आहे. विशेष म्हणजे हे आव्हान साम्यवादासारखे कृत्रिम नाही. ईश्‍वरीय असल्यामुळे सरळ, सोपे परंतु अत्यंत प्रभावशाली आणि लोकहितवादी आहे. म्हणून याला पराजित करणे साम्यवादाला पराजित करणे एवढे सोपे नाही. याची पुरेपूर कल्पना आल्यामुळे आपल्या अंगभूत अवगुणांचा उपयोग करून अमेरिका आणि त्याच्या दोस्त राष्ट्रांकडून इस्लामला बदनाम करण्याच्या डर्टी टॅक्टीस अवलंबिल्या जात आहेत. 

    इस्लामला बदनाम करण्याची गरज
    आपल्या अर्थव्यवस्थेतील फोलपणा आणि इस्लामी अर्थव्यवस्थेतील ठोसपणा याची पुरेशी कल्पना आल्याने त्यातून इस्लामला बदनाम करण्याची गरज निर्माण झाली. याची सुरूवात 1993 साली आलेल्या ’क्लॅश ऑफ सिव्हीलायझेशन्स’ या पुस्तकाने झाली. हे पुस्तक सॅम्युअल फिलिप्स हंटींग्टन या अमेरिकी लेखकाने लिहिलेले आहे. या पुस्तकातून त्याने इस्लामविषयी अशी मांडणी केली आहे की, या पुढे जागतिक स्तरावर युद्ध देशा-देशात होणार नाहीत तर इस्लाम आणि इतर संस्कृतीला मानणार्‍या लोकांमध्ये होईल व त्यात पाश्‍चिमात्य देशांना जगावरचे आपले वर्चस्व गमवावे लागेल.
    शिवाय, मायकल एच.हार्ट या अमेरिकी लेखिकेने ’द हंड्रेड्स’ नावाचे पुस्तक लिहून त्यात स्वत: ख्रिश्‍चन असून, झिजस क्राईस्ट् (अलै.) च्या नावाअगोदर क्रमांक एकवर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे नाव लिहून, त्यांच्या सामाजिक व आर्थिक क्रांतीची दखल घेतली.
    शिवाय, तिसरा एक अमेरिकी लेखक डॉ. जोसेफ अ‍ॅडम पिअर्सन याने म्हटले आहे की, ” जे पाश्‍चिमात्य लोक असा विचार करून घाबरत आहेत की, अरबांच्या हातात अणुबॉम्ब आल्यास काय होईल? त्यांना या गोष्टीची कल्पनाच नाही की (शांतीचा)इस्लामी बॉम्ब तर जगावर त्याच दिवशी पडला आहे ज्या दिवशी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचा जन्म झाला”
    या सर्व अमेरिकी लेखकांच्या मांडणीतून एक गोष्ट स्पष्ट होते की इस्लामच्या नैतिक शक्तीसमोर पाश्‍चिमात्य देशांची आर्थिक आणि लष्करी शक्तीसुद्धा पराभूत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या पराभवाच्या भीतीतून इस्लामच्या विरोधाची अपरिहार्यता निर्माण झाली. त्यात पुन्हा 1938 पासून मध्यपुर्वेतील मुस्लिम देश तेल संपन्न झाल्याने इस्लामच्या वैचारिक शक्तीसोबत आर्थिक शक्तीसुद्धा मजबूत होत गेली. म्हणून विषमतावादी भांडवलशाही अर्थव्यवस्थेला समतावादी इस्लामी अर्थव्यवस्थेची भीती वाटणे साहजिकच आहे असे म्हणालवे लागेल. 50 वर्षे ज्यांनी हार्वड विद्यापीठामध्ये घालविली त्या प्राध्यापक सॅम्युअल हंटिंग्टन यांनी ही भीती अमेरिकेच्या मनामध्ये खोलपर्यंत बिंबविली. म्हणून इस्लामला बदनाम करण्याची विचारपूर्वक योजना आखण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून 9/11 चा हल्ला घडवून आणला गेला. (हा हल्ला इजराईल आणि अमेरिकेच्या गुप्तचर संस्थांनी मिळून घडविला, असे मानणारे नागरिक अमेरिकेत कमी नाहीत. या विषयी बरेच लेखन अनेक चित्रपटांची निर्मितीसुद्धा झालेली आहे.)
    इस्लामोफोबिया पसरविण्याचा निर्णय झाल्यावर त्या कामासाठी मीडियाला जुंपण्यात आले. रात्रं-दिवस 24/7 मीडिया इस्लामच्या विरूद्ध कोकलू लागला व बदनामीची एक वैश्‍विक मोहिम सुरू झाली. त्यात आपल्या देशातील मीडियाही आनंदाने सामील झाला व त्वेषाने इस्लामविरूद्ध प्रसार करू लागला. याच मोहिमेचा एक भाग म्हणून भोळ्याभाळ्या इमामांना स्टुडिओत बोलावून, त्यांना वेडेवाकडे प्रश्‍न विचारून त्यांच्यावर सामुहिक शाब्दिक आक्रमण करून, त्यांना निरूत्तर करून असा देखावा तयार करण्यात आला की, इस्लाम हा एक मध्ययुगीन धर्म असून, त्याची व्यवस्था ही जुनाट आहे, म्हणून 21 व्या शतकातील आधुनिक आव्हानांना हा धर्म आणि या अर्थव्यवस्थेमध्ये उत्तर शोधून उपयोग होवू शकणार नाही.
    अगोदरपासूनच बहुसंख्य समाजातील ते लोक जे इस्लाम संबंधी गैरसमजग्रस्त होते त्यांचा या दुष्प्रचारावर चटकन विश्‍वास बसला. मात्र भांडवलशाही समर्थकांचे दुर्दैव असे की, अलिकडे सोशल मीडियाच्या उदयाने इस्लामच्या बदनामीचे मेनस्ट्रीम मीडियाचे गणित पार बिगडून गेले. सोशल मीडियातून सत्य मांडले जावू लागले व ज्यांची सारासर विवेकबुद्धी शाबूत आहे अशा लोकांच्या लक्षात मेनस्ट्रीम मीडियाची ही चालाखी आली. या परिणाम असा झाला की, इस्लामचा रास्त अभ्यास करून त्याचा स्वीकार करण्याकडे युरोप आणि खुद्द अमेरिकेमध्ये लोकांचा कल वाढला. आजमितीला असा एकही सूर्य मावळत नाही की ज्या दिवशी या देशामधून मूठभर लोकांनी का असेना इस्लामचा स्वीकार केला नसेल. 

बदनामीचे मुद्दे
    इस्लामच्या मुलभूत शिकवणी उदा. शांती, सद्मार्ग, समानता, व्याजमुक्त व्यवस्था, महिलांचे अधिकार आणि संरक्षण, जकात, नैतिकता, नशाबंदी, अश्‍लिलतेवर प्रतिबंध, घर फोडणार्‍या सवईंवर प्रतिबंध, हराम आणि हलालची व्यवस्था, भ्रष्टाचाराला लगाम, बंधूभाव इत्यादी मुल्यांवर मीडियामधून कधीच चर्चा होताना दिसत नाही. याउलट गोहत्या, बहुपत्नीत्व, जनसंख्यावृद्धी, जिहाद, दाढी, टोपी, हिजाब, लव्ह जिहाद, अजान, लाऊड स्पीकर, मदरसे, मध्ययुगीन मुस्लिम शासकांचे अत्याचार इत्यादी मुद्यांवर अनावश्यक चर्चा घडवून आणून इस्लाम व मुस्लिांना बदनाम  केले जाते.
    असे नाही की या सर्व मुद्यांची उत्तरे दिली गेलेली नाहीत. या सर्वांची मुद्देसूद उत्तरे अनेकवेळेस देऊन झालेली आहेत. या संदर्भात पुस्तकेही उपलब्ध आहेत. तरीपण विशेषत: जातीयवादी विचारसणी असणारे लोक ’हेट स्पीच’ देऊन याच मुद्यांचा पुन्हा-पुन्हा उगाळून लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करतात. यामुळेच इस्लामोफोबिया नावाची भीती साधारण नागरिकांमध्ये पसरलेली आहे. 

उपाय
    भारतीय परीपेक्ष्यामध्ये पाहता मुस्लिमांना थ्री टीज म्हणजे तालीम, तरबियत आणि तिजारत, याशिवाय दावत  (इस्लामचा संदेश इतरांपर्यंत पोहोचविणे) आणि खिदमते खल्क (जनकल्याणाची कामे करणे) ही कामे प्राधान्याने करावी लागतील. स्वत:च्या येणार्‍या पीढिला भौतिक आणि नैतिक दोन्ही प्रकारचे शिक्षण देऊन त्यांना इस्लामविषयी जे गैरसमज पसरविण्यात येतात त्यांचे उत्तर देण्याइतपत सक्षम करावयास हवे. शिवाय, त्यांची स्वत:ची वर्तणूक नैतिक आणि इस्लामी मुल्यांप्रमाणे असेल यासाठीही त्यांना बालपणापासूनच प्रशिक्षित करावे लागेल. जकात वितरणाची सामुहिक व्यवस्था निर्माण करावी लागेल. शिवाय, मिळेल त्या माध्यमांतून इस्लामचा संदेश देशबांधवांपर्यंत पोहोचवावा लागेल. व्याजमुक्त पतसंस्थांचे जाळे देशभर पसरवावे लागेल व त्यातून मुस्लिमेत्तर बंधूंना सुद्धा व्याजमुक्त कर्जवाटप करावे लागेल. स्वत:चे व्यापार व्याजमुक्त भांडवलाच्या पायावर उभे करून इतरांना स्वस्त दरात वस्तू उपलब्ध करून द्याव्या लागतील. शिवाय, जनकल्याणांची कामे उदा. दर्जेदार शाळा, रूग्णालये उघडावी लागतील व त्या ठिकाणी मुल्याधारित सेवा द्याव्या लागतील. थोडक्यात आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रात इस्लामी मुल्यांची जपणूक करून प्रत्यक्षात बहुसंख्य बांधवांना असा अनुभव द्यावा लागेल की, इस्लाम तसा नाही जसा मीडियाच्या माध्यमाने त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. खरा इस्लाम हा आहे जो आमच्या आचरणातून तुमच्या अनुभवाला आलेला आहे.
    जगाने आज एवढी प्रगती केलेली आहे की, प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेल्या इस्लामच्या परिचयाचा अव्हेर करून कोणताही सुज्ञ समाज स्वत:चे नुकसान करून घेण्यास तयार होणार नाही. हे काम कठीण आहे पण अशक्य नाही. फक्त योग्य दृष्टीकोण आणि कष्ट उपसण्याची गरज आहे. जमाअत-ए-इस्लामी हिंद या सर्व मुद्यांवर काम करीतच आहे. गरज या संघटनेला साथ देण्याची आहे. नाहीतरी या संघटनेचे संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी यांनी भाकीत करूनच ठेवलेले आहे की,
    ’सत्याकडे (सत्यधर्म अर्थात इस्लामकडे) आपले बोलावणे लोकांच्या बुद्धी आणि मनाला मोहित करत जाईल. आपला सन्मान जगात वाढत जाईल. न्यायाची अपेक्षा आपल्याकडून केली जाईल. विश्‍वास आपल्यावर केला जाईल. पुरावा आपण बोललेल्या गोष्टीचा दिला जाईल. कल्याणाची आशा आपल्याकडून केली जाईल. धर्मविरोधी नेत्यांचा सन्मान आपल्या तुलनेत क्षुल्लक होऊन जाईल. त्यांचे सर्व निर्णय राजकीय आणि आर्थिक दृष्टीकोनातून आपल्या खर्‍या आणि सत्याच्या आवडीच्या तुलनेमध्ये खोटे आणि फोल सिद्ध होतील. आणि त्या शक्ती ज्या आज त्यांच्या गोटामध्ये दिसत आहेत लवकरच त्यांच्यापासून विलग होवून इस्लामच्या गोटात येताना दिसतील.
    इथपर्यंत की एक वेळ अशी येईल जेव्हा साम्यवाद मास्कोमध्ये आपल्या रक्षणासाठी भटकताना दिसेल. भांडवलशाही स्वत: वॉश्िंगटन आणि न्यूयॉर्कमध्ये स्वत:च्या रक्षणासाठी व्याकूळ असल्याचे दृश्य दिसेल. भौतिकवादी आणि नास्तीक (लोक) लंडन आणि पॅरिसच्या विद्यापीठांमध्ये स्थान मिळविण्यामध्ये असमर्थ ठरतील. वंशवादी आणि राष्ट्रवादी लोकांना ब्राह्मण आणि जर्मन लोकांमधून सुद्धा आपले समर्थक मिळणार नाहीत. (संदर्भ : शहादते हक पान क्र.18-19)

- एम. आय. शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget