Halloween Costume ideas 2015

मानवतेच्या कल्याणास्तव जमाअतचे प्रशिक्षण शिबीर

जमाअत-ए-इस्लामी हिंदचे मुख्यालय दिल्लीच्या अबुल फजल इन्क्लेव्ह जामिया नगर भागात असून, एका विस्तीर्ण अशा भूखंडावर मुख्यालयातील अनेक इमारती डौलाने उभ्या आहेत. या ठिकाणी दि. 8 ते 14 सप्टेंबर 2019 या कालावधीत एका प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात सहभागी होण्याची मला संधी मिळाली. या प्रशिक्षण शिबिराच्या महत्वाच्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचविणे गरजेचे वाटल्याने हा लेखन प्रपंच केला आहे.
परिसर
    नांदेड येथून विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 8 सप्टेंबरच्या रात्री 01.00 वाजता पोहोचताच भव्य असे विमानतळ पाहून डोळयाचे पारणे फिटले. देशाच्या राजधानीला साजेशे असे हे विमानतळ असून, तेथून टॅक्सीने जमाअत-ए-इस्लामीच्या मुख्यालयात पोहोचविण्यासाठी टॅक्सीवाल्याने तब्बल 1400 रूपये घेतले. येणेप्रमाणे दिल्लीमध्ये पहिला आर्थिक झटका टॅक्सीवाल्याने दिला.
हॉटेल रिव्हर व्यूव्ह च्या बाजूला जामिया नगर परिसरात असलेल्या जमाअत-ए-इस्लामी हिंद मुख्यालयाची प्रवेशद्वार भव्य असून, तेथे पोहोचताच खाजगी सुरक्षा गार्डनी माझी ओळख पटवून मला प्रवेश दिला. रिसेप्शनवर पोहोचताच तेवढ्या रात्रीही एका तरूणाने अतिशय आत्मीयतेने माझी चौकशी केली आणि माझ्या निवासाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी सोबत माणूस दिला. ही जमाअत-ए- इस्लामी हिंदच्या मुख्य कार्यालयाची तीन मजली इमारत होती. दुसर्‍या मजल्यावर सर्व प्रशिक्षणार्थींची राहण्याची सोय करण्यात आलेली होती.
    9 सप्टेंबरला सकाळी 8.30 वाजता न्याहारी करून 9.00 वाजता मुख्य कार्यालयाच्या शुरा हॉलमध्ये पोहोचलो.  त्या ठिकाणी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना एकत्रित करण्यात आले. ठीक 9.00 वाजता कुरआन पठणाने या सत्राच्या पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सुरूवात झाली. त्यानंतर भारताच्या अनेक राज्यातून अनेक राज्यातून आलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या परिचयाचा कार्यक्रम झाला.
    यानंतर कार्यक्रमाचे संयोजक मौलाना वलीउल्लाह सईदी फलाही (सचिव प्रशिक्षण विभाग) यांनी या प्रशिक्षणामागचा उद्देश सांगितला. त्यांनी सांगितले की, ‘मानवतेचे कल्याण हा इस्लामचा मुख्य उद्देश असून, ते साध्य करण्यासाठी कार्यकर्ते तयार करावेत हे या प्रशिक्षण शिबिराच्या आयोजनाचे उद्देश्य आहे.’ त्यानंतर अमीर जमात-ए-इस्लामी हिंद सय्यद सआदत्तुलाह हुसैनी यांचे प्रमुख भाषण झाले. त्यात त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित करून सांगितले की, ”या प्रशिक्षणादरम्यान सात मुद्यांवर तुम्हा सर्वांना प्रशिक्षण घेऊन आपापल्या ठिकाणी जावून जमाअतच्या इतर सदस्यांना प्रशिक्षित करावयाचे आहे.
1. जाणीवपूर्वक इमानधारण करून इस्लामी श्रद्धेची प्रत्यक्ष अमलबजावणी करून आपल्या समाजाची व देशबांधवांची सेवा करणे.
2. अल्लाह आणि त्याचे प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या विषयीचे प्रेम आपल्या मनामध्ये उत्पन्न करून त्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे जनकल्याणासाठी स्वतःला वाहून घेणे.
3. इस्लामी इबादती ह्या जाणीवपूर्वक करणे विशेषतः नमाज या महत्त्वाच्या इबादतीमध्ये कुठलीही बारीक सारीक उणीवसुद्धा राहणार याची काळजी घेणे. जेणेकरून तुमचे चारित्र्य उंचावेल.
4. माणसाच्या छोट्या-मोठ्या चुका ज्या अल्लाह आणि प्रेषित सल्ल. यांच्या नजरेमध्ये गुन्हे आहेत त्यांना सोडणे, कारण अल्लाहचा नूर (प्रकाश बोध) गुन्हेगाराच्या अंतःकरणामध्ये उज्ज्वलता पसरवित नाही. फर्ज आणि सुन्नत नमाजाशिवाय शक्यतेवढ्या जास्त नफ्ल नमाज अदा करण्याचा प्रयत्न करावा.
5. कुठल्याही परिस्थितीत भ्रष्ट मार्गाने संपत्ती कमवायची नाही, कारण भ्रष्ट कमाईने खाललेल्या अन्नामुळे दुआ स्विकारली जात नाही, मन साफ होत नाही, त्यामुळे चांगल्या कामामध्ये माणसाचे मन रमत नाही.
6. सातत्याने आपल्या मृत्यूची आठवण ठेवावी. काहीही केले तरी मृत्यू सोडणार नाही, मग वाईट करून आखिरत बर्बाद करून घेण्यापेक्षा चांगले काम करून पुण्य कमवून आखिरतच्या जीवनामध्ये यशस्वी होणे कधीही चांगले. म्हणून मृत्यूची सातत्याने आठवण ठेवा.
7. जास्त खाणे, जास्त बोलणे आणि जास्त झोपणे टाळा.
    त्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. त्यात कर्नाटकहून आलेल्या एका प्रशिक्षणार्थ्याने कुरआनचा परिचय करून दिला. त्यानंतर तद्बरूल कुरआन या कुरआनच्या भाष्यावर मौलाना हामीद अली फलाही (पश्‍चिमी उत्तर प्रदेश) यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर मारेफुल कुरआन या कुरआनच्या भाष्यावर मौलाना मोहम्मद शर्फ अली कास्मी (तेलंगना) यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर तफसीरे उस्मानी या कुरआनच्या भाष्यावर मुबारक अली (राजस्थान) यांनी आपले विचार व्यक्त केले. त्यानंतर तफहीमुल कुरआन या कुरआनच्या भाष्यावर श्रीमती शहेनाज बतुल (कर्नाटक) यांनी आपले विचार व्यक्त केले. या वेगवेगळ्या कुरआन भाष्यांवर विचार व्यक्त करण्यात आल्यावर त्या सर्वांचा आढावा मौलाना नईमुद्दीन इस्लाही (व्हा. चान्सलर जामियतुल फलाह, आझमगढ) यांनी घेतला.
    त्यानंतर जोहरची नमाज अदा करून जेवण करण्यासाठी सुट्टी देण्यात आली. ठीक 3 वाजता वाचनालयामध्ये सर्वांना एकत्रित बोलावून इस्लामवरील वेगवेगळ्या विषयावरील प्रत्येकी 4 पुस्तके भेट देण्यात आली व त्यातील हदीसच्या पुस्तकाचा एक तास अभ्यास करून घेण्यात आला. त्यानंतर 4 ते 5 वाजेपर्यंत ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ इस्लामिक स्टडीज या संस्थेमध्ये नेवून त्या संस्थेच्या कामकाजाचा परिचय करून देण्यात आला. त्यानंतर असरच्या नमाजची सुट्टी देण्यात आली. त्यानंतर सामुहिक अभ्यास, परत मगरीबची नमाज, त्यानंतर कुरआनच्या सुरह मरियमचा सामुहिक अभ्यास करण्यात आला. 9 वाजता इशाच्या नमाजसाठी सुट्टी देण्यात आली. नमाजनंतर जेवण करून लगेच झोपण्याच्या सूचना देण्यात आल्या. कारण दुसर्‍या दिवशी परत पहाटे 3.30 पासून दुसर्‍या दिवसाची दिनचर्या सुरू होणार होती. त्यात तहाज्जुदची नमाज, तजवीदचा क्लास, फजरची नमाज आणि त्यानंतर तज्ज्ञ शिक्षकांकडून योगाचे वर्ग घेण्यात येणार होते. आठवडाभर सर्व कार्यक्रम ठरल्याप्रमाणे पार पडले.
    दुसर्‍या दिवशी कुरआन पठणानंतर महत्त्वाच्या विषयांमध्ये ’दुआ’ या विषयावर आबीद अन्वर फारूकी (बिहार) त्यानंतर ’हया’ (लज्जा) या विषयावर मुहम्मद अहेमद (पंजाब) त्यानंतर ’आर्थिक स्थैर्य’ यावर शेख अन्वर (मुंबई) व त्यानंतर ’वैवाहिक जीवन ’ या विषयावर श्रीमती फय्याजुन्निसा (तेलंगना) त्यानंतर ’हदीसचा अभ्यास आणि महिलांची कामगिरी’ या विषयावर मौलाना वलीउल्लाह सईदी फलाही यांनी आपले विचार व्यक्त केले.
    तिसर्‍या दिवशी कुरआन पठणानंतर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या जीवनावर वेगवेगळ्या दृष्टीने प्रकाश टाकण्यात आला. त्यात प्रथमतः ’प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे नेतृत्व’ यावर जावेद मुहम्मद (पूर्व उत्तरप्रदेश) त्यानंतर ’प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे राज्य’ यावर मुन्नवर पाशा (कर्नाटक), त्यानंतर ’प्रेषित मुहम्मद सल्ल. यांचे नियोजन’ यावर मुहम्मद बशीरोद्दीन (तेलंगना) त्यानंतर ’प्रेषित मुहम्मद सल्ल. आणि संगोपनातील कौशल्य’ या विषयावर श्रीमती नफिसा अतीक (महाराष्ट्र), त्यानंतर ’प्रेषित सल्ल. यांच्या जीवनावर असलेल्या दुर्लभ पुस्तकांचा परिचय’ या विषयावर एस.अमीनुल हसन (उपाध्यक्ष जमाअत-ए-इस्लामी हिंद) यांनी तर ’कायद्याविषयी जागरूकता’ या विषयावर माझे (एम.आय.शेख,लातूर-महाराष्ट्र)) भाषण झाले. त्यानंतर दुपारून  जमाअतच्या प्रकाशन विभागातील ’रेडियन्स’ या इंग्रजी साप्ताहिकाच्या कार्यालयाला भेट देऊन तेथील कामकाजाचे अवलोकन करण्याची संधी मिळाली.
    चौथ्या दिवशी कुरआन पठणानंतर प्रोजेक्टरद्वारे एक व्हिडीओ दाखविण्यात आला, ज्यात जमाअत-ए-इस्लामी हिंदचे संस्थापक मौलाना अबुल आला मौदूदी (रहे.) यांनी जमाअतला 29 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने जे भाषण दिले होते तो युट्यूबर उपलब्ध असलेला ऑडिओ ऐकवण्यात आला. त्यानंतर ’जमाअत-ए-इस्लामी हिंदचा इतिहासाचा परिचय ’ नुसरत अली (अध्यक्ष, शैक्षणिक बोर्ड) यांनी करून दिला. तद्नंतर दुपारून इस्लामी साहित्य ट्रस्ट द्वारे चालवल्या जाणार्‍या मधूर संदेश संगम या संस्थेला भेट देऊन तेथील कामकाज समजून घेण्यात आले. त्यानंतर ठरल्याप्रमाणे इतर नियमित कार्यक्रम पार पडले.
    पाचव्या दिवशी कुरआन पठणानंतर ’इस्लामची आत्मचिंतनाची पद्धती’ या विषयावर मौलाना रजिऊल इस्लाम नदवी यांचे भाषण झाले. त्यानंतर चार विषयावर ग्रुप डिस्कशन (सामुहिक चर्चा) घडवून आणण्यात आले. प्रशिक्षणार्थ्यांचे चार गट करण्यात आले. पहिल्या गटाला, ’ दिल की दुनिया कैसे बदले?’ दुसर्‍या गटाला ’हम अपनी सलाहियतों को कैसे पहेचाने?’ तिसर्‍या गटाला ’गौर और फिक्र की आदत कैसे पैदा करें?’ आणि चौथ्या गटाला ’तआल्लुक बिल्लाह को कैसे मजबूत करें?’ या विषयावर चर्चा घडविण्यात आली.
    सहाव्या दिवशी कुरआन पठणानंतर ’भारतीय राजकारण’ या विषयावर राजकीय विश्‍लेषक रिजवान एहसन यांचे भाषण झाले. त्यानंतर ’हिंदू सनातन धर्माचा परिचय’ या विषयावर स्वामी लक्ष्मीशंकर आचार्य यांचे भाषण झाले. त्यानंतर ह्युमन वेलफेअर फाऊंडेशन व्हिजन 2026 या संस्थेला भेट देऊन संस्था देशभरात करत असलेल्या समाजकार्याची माहिती देण्यात आली.   
    सातव्या म्हणजे शेवटच्या दिवशी कुरआन पठणानंतर ’मध्यपुर्वेतील मुस्लिम देशांचा परिचय’ या विषयावर जामिया मिलीया इस्लामिया विद्यापीठाचे प्रा. जावेद अहेमद खान यांचे भाषण झाले. त्यात त्यांनी अनेक आश्‍चर्यकारक खुलासे केले. 1930 च्या दशकात ब्रिटीश अभियंत्यांना सउदी अरबच्या जमिनीमध्ये तेल असल्याचा अंदाज आला. त्यावर त्यांनी शोध करून काळेकुट्ट बेंदाडासारखा एक पदार्थ शोधून काढला. एका बॅरेलला दोन डॉलर रॉयल्टी देउन त्यांनी सउदी राजाला खुश केले. दोन अमेरिकी डॉलर प्रती बॅरल बेंदाडाचे मिळत असल्याचे पाहून सउदी राजा आनंदीतच नव्हे तर संतुष्ट झाला आणि त्याने ’अहलन सहलन मरहबा’ म्हणत ब्रिटीशांचे स्वागत केले. या गोष्टीचा अंदाज येताच अमेरिकनही सउदी अरबमध्ये पोहोचले आणि मोठ्या प्रमाणात क्रुड ऑईलचे साठे शोधून काढले. जवळ- जवळ 1973 पर्यंत अमेरिका आणि ब्रिटीश लोकांनी 2 डॉलर रॉयल्टीवर अमाप क्रुडतेलाचा साठा उपसून आपल्या देशात नेला आणि युरोप आणि अमेरिकेची जी प्रगती आज दिसते आहे, ती याच काळात जवळ-जवळ फुकटात मिळालेल्या तेलाच्या बळावर झालेली आहे.
    दरम्यानच्या काळात सउदी तरूण युरोप आणि अमेरिकेमध्ये भ्रंमतीसाठी जावू लागले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपल्याकडून जे बेंदाडवजा रसायन हे लोक घेवून येत आहेत ते सोन्यापेक्षाही जास्त मुल्यवान असे पेट्रोलियम पदार्थ आहेत. तेव्हा त्यांना जाग आली आणि त्यांनी ओपेकचे गठन केले. मग 1974 ला दोन डॉलर रॉयल्टी स्विकारण्यास त्यांनी इन्कार केला आणि क्रुड ऑईलची विक्री सुरू केली. तेव्हा दोन डॉलर प्रती बॅलर तेलाची किंमत एकदम 100 डॉलर प्रती झाली आणि येथून सउदी अरब सहीत खाडीच्या देशांच्या आर्थिक प्रगतीला सुरूवात झाली. त्यानंतर सउदी अरब व्यतिरिक्त खाडीच्या इतर देशांमध्येही तेलाचे साठे शोधण्यास सुरूवात झाली आणि इराक, इराण, सीरिया, लेबनान इत्यादी मुस्लिम देशांमध्ये प्रचंड तेलाचे साठे मिळून आले. आणि जगाने त्या हदीसला प्रत्यक्ष रूपाने प्रकट होताना याची देही याची डोळा पाहिले की, ज्यात प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी भाकित केले होते की, ”एक दिन सरजमीने अरब सोना उगलेगी”
    मात्र तेलाच्या या अमुल्य अशा खजीन्यावर युरोप आणि अमेरिकेने नियंत्रण मिळविले होते. ते आजही काही प्रमाणात तसेच आहे. जेव्हा खाडीच्या अरब देशांनी अमेरिका आणि युरोपच्या पंजातून आपल्या तेलाची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भोळ्या अरबांना आपसात लढवून अमेरिकेने अनेक सशस्त्र गट त्यांच्यात तयार केले. इराक आणि इराण मध्ये युद्ध घडवून आणले. इराक आणि लिबिया यांना उध्वस्त करून टाकले. तेलावर नियंत्रण मिळविण्याच्या रणनितीचा हा एक भाग होता.
    या भाषणानंतर प्रशिक्षणार्थ्यांचे अनुभव कथन करण्यात आले, त्यात एकतास प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. शेवटी अमीरे जमाअत सआदतुल्लाह हुसैनी यांच्या समारोपाच्या भाषणाने प्रशिक्षण शिबिराची सांगता झाली. याप्रसंगी अमीरे जमाअत यांनी आपल्या दुआमध्ये देश आणि देशातील सर्व लोकांच्या प्रगतीची कामना केली.
    एकंदरित प्रशिक्षण अतिशय उत्कृष्ट पद्धतीने देण्यात आले. त्यात सामाजिक, धार्मिक आणि राष्ट्रीय विषयांचा समावेश असल्याने अतिशय समर्पक अशा गोष्टी शिकण्यास मिळाल्या. सातत्याने पहाटे तहाज्जुदची नमाज अदा केल्यामुळे तसेच कुरआनच्या विविध पैलूंवर नियमित प्रकाश टाकला गेल्यामुळे एका प्रकारचा अध्यात्मिक आनंद मिळाला. आत्मिक उन्नती झाल्याचा अनुभव आला.

- एम.आय.शेख

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget