Halloween Costume ideas 2015

'स्वर्ग' आणून ठेवला आईच्या 'पाया'खाली...!

ज्या काळी जगातील श्रेष्ठ तत्वज्ञान स्त्रीमध्ये आत्मा असतो कि नाही? सारख्या गप्पा मारण्यात व्यस्त होते त्या काळात प्रेषित मुहम्मदांनी स्त्रीला सर्वच क्षेत्रात समान (एकसारखे  नव्हे) अधिकार देऊन टाकले. प्रसिद्ध माक्र्सवादी भारतीय विचारवंत एम. एन. रॉय आपल्या ‘इस्लामचे ऐतिहासिक योगदान’ या पुस्तकात स्त्रीला माणूस म्हणून दर्जा देणारा धर्म  ‘इस्लाम’ असल्याचा उल्लेख करून प्रेषितांच्या कार्याचा गौरव करतात. अरब समाजाच्या नसानसात भिनलेल्या, जन्मलेल्या मुलीला जिवंत पुरायच्या प्रथेला केवळ १३ वर्षाच्या कालखंडात  प्रेषितांनी अशाप्रकारे हद्दपार करून दाखविले की मागील १४५० वर्षाच्या इतिहासात एकाही मुलीला केवळ मुलगी असल्यामुळे मारण्यात आलेले नाही. सच्चर समितीच्या रिपोर्टनुसार  भारतीय मुस्लीम समाजात मुलींचे प्रमाण सरासरीपेक्षा जास्त आहे.
जगात महिलांसाठी इस्लाम एक क्रांतिकारक संदेश ठरला आहे. हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या प्रख्यात जर्मन महिला प्राध्यापक एनमेरी स्कीमेल म्हणतात कि, तुलनात्मक दृष्टीने पहिले असता  असे दिसते कि इस्लामने महिलांना दिलेले अधिकार इतरांच्या मानाने कित्येक पटीने पुरोगामी आहेत. प्रेषित मुहम्मदांनी आईला जगातील कोणत्याच धर्मात नसलेला दर्जा दिला आहे. प्रत्येक धर्मात स्वर्ग आणि नरक या कल्पना आहेत. ‘स्वर्ग’ प्रत्येक धर्मात सर्वोच्च असून धर्मातील सर्वोच्च संकल्पना असलेला 'स्वर्ग' इस्लामने आईच्या 'पाया'खाली आणून ठेवला आहे.  ’जन्नत मां के कदमो के नीचे’ असल्याची शिकवण आपल्या सर्व अनुयायांना पैगंबरांनी दिली आहे. आईसोबतच पत्नीलाही विशेष दर्जा दिला आहे. सांगितले आहे की, ’तुमच्यापैकी सर्वोत्तम मुस्लीम तो आहे जो आपल्या पत्नीसाठी सर्वोत्तम पती असेल.’
मुलीला हे स्थान दिले की ’ज्याला एक, दोन किंवा त्यापेक्षा जास्त मुली असतील आणि तो त्यांचे पालनपोषण न्यायोचित पद्धतीने करेल, तो स्वर्गात माझ्या शेजारी असेल ही शिकवण  प्रेषितांनी दिली. 'लेडीज फस्ट' ही संकल्पना ही इस्लामचीच जगाला देणं आहे. कुटुंबात कोणत्याही गोष्टीचे वाटप मुली किंवा महिलांपासून करायला हवे असा अलिखित संकेत प्रत्येक  इस्लामी कुटुंबात पाळला जातो.
कुणाला काही द्यायचे असेल तरीही आधी ते मुली किंवा महिलांना देण्याची परंपरा आहे. त्यामुळे घरात आलेली नवीन वस्तू असो की नवीन विचार तो घरातील मुली आणि महिलांना  सर्वात आधी दिल्या किंवा सांगितल्या जातो. त्यामुळे घरात होणाऱ्या सर्व निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग असतोच असतो. पैगंबरांनी कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सल्ला वैध  मानला आहे.
लग्न ही सर्व धर्म, पंथ व जाती समुदायांमध्ये सांगितलेली महत्वाची सामाजिक परंपरा आहे. मात्र बहुतांश समाजात लग्न प्रक्रीयेत महिलेला दूय्यम स्थान दिले आहे. अनेक समाजात  मुलीच्या पसंती आधी मुलाची संमती महत्वाची मानली जाते. मुलीला पहायला मुले जातात. मुलींना मात्र तशी सवलत दिली जात नाही. लग्नात माला घालण्याचा पहिला अधिकार  नवरदेवालाच असतो. मुलीचे लग्न करण्यासाठी वधूपक्ष वरपक्षाला हुंडा देतो. इस्लाम मध्ये मात्र यापैकी बऱ्याच प्रथा परंपरा मोडून काढण्यात आल्या आहेत. इस्लाम मधील निकाह  वधूच्या परवानगीने सुरु होतो. प्रत्येक निकाहसाठी एक काझी, एक वकील व दोन साक्षीदार नियुक्त केले जातात. प्रत्येक निकाहसाठी ही मंडळी वेगवेगळी असते. काझींच्या सुचनेवरुन  निकाहसाठी नियुक्त वकील व दोन्ही साक्षीदार वधूची परवानगी घ्यायला वधू जिथे बसून असेल त्या जागेवर जातात. तिला वर मुलाचा परिचय देतात आणि या मुलाशी तुझा निकाह  होत असून तो तुला कबूल आहे का? असे विचारतात. वधूने होकार दिल्यास हा होकार आणखी दोनदा वदवून घेतल्या जातो. मुलीने दिलेला निकाहचा होकार वकील आणि साक्षीदार  सार्वजनिकरित्या जाहीर करतात आणि ही प्रक्रीया पुर्ण केल्याशिवाय काझी मुलाला मुलीच्या स्विकार करण्याविषयी विचारणा करीत नाही. निकाहमध्ये अशा प्रकारे मुलगा पसंत आहे  किंवा नाही हे सांगण्याचा पहिला अधिकार नवऱ्या मुलीला दिला आहे. शिवाय ‘मेहर’ ही अतिशय चांगली पध्दत इस्लाम मध्ये आहे. निकाह पुर्वी नवऱ्या मुलाला एक विशिष्ट रक्कम  मुलीला देत असल्याचे जाहिर सांगावे लागते. 'मेहर' रक्कम किंवा दागिन्याच्या रुपात कबूल करावा लागतो. हे नवऱ्या मुलीचे नवर देवावर कर्ज किंवा उधार असते. ते त्याला पुढे कधी  ही फेडता येते. शिवाय हा निकाह पंजिकृत असतो. प्रत्येक मशिदीत निकाह नोंदणी रजिस्टर असते. त्यात प्रत्येक निकाहची नोंद केली जाते. यात नवरा, नवरीन, वकील, साक्ष, काझी  यांची नावे व स्वाक्षरी असते. शिवाय मेहरची नोंदही केलेली असते. या नोंदीच्या प्रती म्हणजेच निकाहनामा वर व वधू दोन्ही पक्षांना दिल्या जातो. या सर्व महिला हिताच्या प्रथा  इस्लाम मध्ये निकाह रुढ झाल्या पासूनच आहेत आणि अजूनही कोणत्याही अडचणी शिवाय सुरु आहेत.
लग्ना प्रमाणेच एखाद्या महिलेला लग्नानंतर पती पसंत नाही किंवा इतर कोणत्याही कारणास्तव आपल्या पतीला सोडायचे असल्यास ती आपल्या पतीला बिनदिक्कत सोडू शकते. याला  'खुला' म्हणतात. लग्न झालेल्या कोणत्याही महिलेला आपल्या पतीला सोडण्याचा असा अधिकारही फक्त इस्लामने दिला आहे. पूर्वी महिलांवर अतोनात अत्याचार केले जात. अरब  प्रांतही त्यापासून सुटला नव्हता. अशा परिस्थितीत त्याकाळी अरबातील विवाहित महिलांना मिळालेला हा अधिकार क्रांतिकारक असाच होता.
इस्लामचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांचा विवाह सुद्धा महिलांचा समाजात सन्मान वाढविणारा होता. ज्या काळी महिलांना माणूस म्हणूनही फारशी समाजमान्यता नव्हती त्याकाळी महंमदांनी अतिशय आदर्श विवाह करुन आपल्या अनुयायांपुढे अद्वितीय असे उदाहरण ठेवले. पैगंबरांनी आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या महिलेशी विवाह केला. शिवाय  त्यांची ही पत्नी विधवा होती. सुमारे चौदाशे वर्षांपुर्वी झालेला हा अशा प्रकारचा जगातील पहिला विवाह असावा. ज्यात एका वयाने मोठ्या व विधवेशी विवाह केल्या गेला होता.

-आमीन चौहान
यवतमाळ, मो. ९४२३४०९६०६

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget