Halloween Costume ideas 2015

वायुसेनेची दमदार कामगिरी

१४ फेब्रुवारी रोजी पुलवामा येथे झालेल्या आतंकवादी हल्ल्याचा भारत बदला घेण्यासाठी काहीतरी मोठी योजना आखत आहे, असे अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटल्याच्या 48  तासाच्या आत भारतीय वायू सेनेने धडक कारवाई करत 26 फेब्रुवारीच्या पहाटे तीन ते साडेतीनच्या दरम्यान पाकिस्तानच्या खैबर पख्तूनखाँ प्रातांच्या बालकोट येथे जाऊन जैश-ए- मोहम्मदच्या प्रशिक्षण केंद्रावर हजार किलो वजनाचे बॉम्ब टाकून ते केंद्र उध्वस्त करून टाकले. पाकिस्तानी वायूसेनेला काही कळण्याच्या आत टेक ऑफ आणि लँडिंगसह अवघ्या 19  मिनिटात ही कामगिरी फत्ते करून भारतीय वायूसेनेने एकीकडे पाकिस्तानला चकीत केले तर दूसरीकडे जगाला आपल्या व्यावसायिक निपुनतेचे प्रदर्शन करत देशाची मान उंचावली.  अतिशय धोकादायक अशा या कामगिरीमध्ये कुठलीही चूक होणार नाही, याचे सुक्ष्म नियोजन वायुसेनेने केले होते म्हणून वायुसेनेची ही कामगिरी कुठलेही नुकसान न होता पार पडली.  ही अतिशय समाधानाची आणि आत्मगौरवाची अनुभूती देणारी घटना आहे. या हल्ल्यानंतर देशामध्ये जे जल्लोषाचे वातावरण आहे ते 1971 नंतर 48 वर्षांनी पुन्हा अनुभवायला मिळत  आहे.
या हल्ल्याने भारताच्या तिन्ही सेनादलांचे मनोबल उंचावले असतांनाच पाकिस्तानच्या सेनादलांचे मात्र नैतिक धैर्य खचवले आहे. बीबीसीच्या रिपोर्टमध्ये म्हटल्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये  सुतकी वातावरण असून, पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पक्षावर प्रचंड टिका होत आहे. तिथे जणू प्रसार माध्यमांमध्येच युद्ध सुरू झालेले आहे. या हल्ल्यामुळे पाकिस्तानी  वायुसेनेच्या मर्यादाही उघड झालेल्या आहेत. त्यांच्या एअर सर्व्हेलन्स सिस्टम अर्थात रडार यंत्रणेला भारतीय विमानांची उपस्थिती नोंदविता आलेली नाही. त्यांचा एअर डिफेन्स सिस्टम  खूप जुना असून, रशियाकडून भारताने जो एअर डिफेन्स सिस्टम घेतलेला आहे तो अधिक परिपक्व आहे. भारतीय एअर डिफेन्स सिस्टम एवढा प्रभावशाली आहे की, तो पाकिस्तानच्या  विमानांची तैनातीच नव्हे तर मिजाईल तैनातीच्या लोकेशनचाही सहज अंदाज घेऊ शकतो.
भारतीय विदेश विभागाचे सचिव विजय गोखले यांनी अतिशय संयत अशी प्रतिक्रिया देत या कारवाईला पाकिस्तानविरूद्ध कुठलीही सैनिक कारवाई नसल्याचे सुचवून ही एक  आतंकवादाविरोधी कारवाई असल्याचे म्हटलेले आहे. सरकारकडून कुठल्याही प्रकारची उन्मादक अशी प्रतिक्रिया न आल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरही या कारवाईचे समर्थनच झालेले आहे.  पाकिस्तानने या संदर्भात कितीही कांगावा केला तरी आतंकवाद्यांना शरण देणारे राष्ट्र म्हणून झालेल्या बदनामीमुळे कोणीही पाकिस्तानच्या म्हणण्याला महत्व दिलेले नाही. त्यांचा  सगळ्यात जवळचा मित्र चीनने देखील भारताच्या या कारवाईचा विरोध केला नाही म्हणून ही भारतीय कुटनीतीची विजयी भरारी आहे, असे म्हणता येईल.
सर्जिकल स्ट्राईक एक प्रमाणेच सर्जिकल स्ट्राईक दोन मध्येही आपले कुठलेही नुकसान झालेले नसून भारतीय विमानांनी आपला पेलोड जंगलात टाकून पळ काढल्याचे हास्यास्पद विधान  पाकिस्तानी आर्मीचे प्रवक्ते मेजर जनरल आसीफ गफूर यांनी केले. पाकिस्तानकडून कुठल्याही जिवितहानीचा इन्कार करण्यात आलेला आहे. दरम्यान, अखनूर सेंटरमध्ये  पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार झाल्याने भारतीय सेनेचे चार जवान जखमी झाल्याचे वृत्त आहे.
सीमेलगतच्या सर्व गावांना रिकामे करून शाळा बेमुदत बंद ठेवण्याचे आदेश राज्यपालांनी दिलेले आहेत. दक्षिण एशियाच्या घडामोडीचे अभ्यासक प्रा. क्रिस्टीन फेअर यांनी असे म्हटले  आहे की, पाकिस्तान कदाचित भारताच्या या हवाई कार्यवाहीचे उत्तर हवाई कार्यवाहीने देणार नाही. कारण ज्या पद्धतीने झालेले नुकसान तो कमी करून जगाला दाखवत आहे त्यावरून  तर हाच अंदाज काढता येतो. पाकिस्तानच्या हाती काश्मीर सीमेवर गोळीबार किंवा उखळी तोफांचा मारा करण्यापेक्षा जास्त पर्याय शिल्लक नाहीत. त्यांनी जर विमाने भारतीय हद्दीत  घुसविली तर ती पाडली जातील याची पाकिस्तानला चांगली कल्पना आहे. भारताने केलेल्या कारवाईनंतर ऑस्ट्रेलियासह अनेक देशांनी ट्रम्प आणि शी जीनपिंग यांच्याकडे मध्यस्ती  करण्यासाठी विनंती केलेली आहे. एकंदरित या धडक कारवाईमुळे भारतीय जनतेमध्ये समाधान आणि उल्हासाची संमिश्र भावना उत्पन्न झालेली आहे.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget