Halloween Costume ideas 2015

नामांतराचे वादळ!

सध्या देशात नामांतराचे वादळ खूप सोसाट्याने धावत चालले आहे. याचा आरंभ उत्तर प्रदेशच्या योगी महाराजांनी केला. इलाहाबादचे सरळ प्रयागराज करून टाकले आणि हे लोण आता महाराष्ट्र व गुजरातमध्येही आले आहे. याचा अर्थ सत्ता हातात आली की मनाला येईल ते करता येते! विशिष्ट वर्गाला वाटेल तशी वागणूक देऊन त्याचा उपमर्द करता येतो. तथापि हेच  ध्येय धोरण उराशी बाळगून सत्तेचा, उच्च पदाचा गैरवापर करून जर एखाद्याला मनसोक्त आनंद लाभत असेल तर तो थोड्या दिवसांचा आनंद ठरतो. कालचक्राच्या प्रवाहात केवळ  तेच टिकून राहते जे जनसामान्यांच्या हित-कल्याणाचे असते. अकबराने आपल्या शासनकाळात ‘दीने इलाही’ नावाचा धर्म स्थापन केला. जी हुजूरी करणाऱ्या लोकांनी अकबराला खूश  करण्यासाठी हा नवीन धर्म स्वीकारला, पण कालांतराने अकबराच्या निधनानंतर त्याने स्थापन केलेल्या धर्माचेही निधन झाले. आज तो नावालाही उरला नाही.
नामांतर करताना सत्ताधारी मंडळी एक गोष्ट खूप कटाक्षाने पाळतात ती म्हणजे मुस्लिमांचा नामनिर्देश करणारी नावे तेवढी बदलावीत. मुस्लिम राज्याकर्त्यांचे प्रतीक असलेली नावे म्हणून परकियांची नावे नकोत हा युक्तिवाद मांडून मनाजोगते करून घ्यायचे! मुस्लिमद्वेष इतका विकोपाला गेला आहे की मुस्लिम नावदेखील नकोसे झाले आहे. वस्तुत: देशाला आज  एकात्मतेची, एकसंघत्वाचेी नितांत गरज आहे. आर्थिकदृष्ट्या देश डबघाईला आलेला आहे. कष्टकरी सर्वसामान्य जनतेचे वाढत्या महागाईमुळे अतोनात हाल होत आहेत. नापिकी, पुरेसा  पाऊस न पडल्यामुळे आणि सावकारी कर्जाचा डोंगर शिरावर असल्यामुळे अगतिक झालेल्या हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी आणि वाईट व्यसनांच्या आहारी जाऊन  वाममार्गाला लागलेल्या तरुणांची वाढती गुंडगिरी, अवैध मार्गाने भरपूर पैसा कमविण्याची लालसा, स्त्रीयांवरील अत्याचारांचे वाढते प्रमाण, दुर्गम अशा पर्वतीय क्षेत्रात आदिवासी बालकांचे  होत असलेले कुपोषण, जातीधर्माच्या नावाखाली विभिन्न समाजांत वाढत जाणारे वैमनस्य व तिरस्काराची भावना, अराजकता वगैरे प्रश्न ज्वलंत समस्यांच्या रूपाने समोर उभे असता  उठसूट शहरांची नावे बदलण्याचा सपाटा चालवण्यात कोणते जनहित साध्य केले जाणार आहे? केवळ आपला धर्म, आपली जात वर्चस्वशाली राहावी, सर्वांवर आपले अधिपत्य गाजवले जावे यासाठी हा अट्टाहास तर नव्हे?
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आपल्या राजकारणासाठी, सत्ता हस्तगत करून शिवरायांच्या नावाचा सोयिस्कर वापर करून मुस्लिमद्वेषाला खतपाणी घालण्याचा उद्योग  करणाऱ्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी की छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तित्व इतके उत्तुंग आणि उदात्त होते की मुस्लिमांचा अकारण द्वेष करण्याची भावना त्यांच्या  लष्करात मोठमोठ्या पदांवर मुस्लिमांची नियुक्ती त्यांनी केली नसती. स्वत: त्यांचा अंगरक्षक एक मुस्लिम होता, हे ऐतिहासिक सत्य आहे. एखाद्या विशिष्ट समुदायाला सतत पररका,  म्लेंच्छ आणि देशद्रोही संबोधून हिणवत राहिल्याने त्यांच्या मनात तुमच्याविषयीची आदरभावना टिकून राहील का?
जगप्रसिद्ध इंग्रजी लेखक विल्यम शेक्सपीयर च्या कथनानुसार ‘व्हॉट्स इन नेम?’ अर्थात नावात काय आहे? सूर्याला विविध भाषेत वेगवेगळी नावे आहेत. त्याला कोणी भास्कर म्हणतो,  कोणी इंग्रजीत ‘सन’ म्हणतो, कोणी शम्स म्हणतो. आता नावे भिन्न भिन्न असली तरी सूर्याचा चंद्र होत नाही. सर्वार्थाने तो सूर्यच गणला जातो.
आपली भाषा, आपली संस्कृती, आपल्या परंपरा याचा सर्वांनाच स्वाभिमान असतो आणि तो असायलाही हवा, कारण याच माध्यमान्वये आपली ओळख होत असते. तथापि याचा अर्थ  ‘आपलं ते बाळ अन् दुसऱ्याचं ते कार्टं’ या न्यायाने इतर जातीधर्मांच्या लोकांना सापत्न वागणूक देणे, त्यांच्यासाठी अवमानपूर्ण शब्दांचा प्रयोग करणे, किंबहुना त्यांना परके आणि देशद्रोही ठरविणे असा मुळीच नाही. भारत देश, जगाच्या पाठीवर असा एकमेव देश आहे की ज्यात फार पूर्वीपासून अनेकविध जातीधर्मांचे आणि पंथसंप्रदायांचे लोक गुण्यागोविंदाने हात  आले आहेत. सर्वांची आस्था आणि श्रद्धा भिन्न, आचरण भिन्न, विचारधारा भिन्न, भाषा भिन्न, धार्मिक विधी भिन्न; पण असे असले तरी सर्व भारतीय या नावानेच ओळखले जातात.  परदेशात गेलेल्या इसमाला कुणी त्याचे गोत्र, कुळ, जात, धर्म विचारत नाही. पुढे त्याच्या आचारविचाराने तो नेमका कोण ते कळतं, तरीही तो भारतीय आहे ही ओळख कायम राहते.
अवकाळी पाऊस पडावा तसं नामांतराचं अवकाळी घोंघावणारं वादळ, बहुसंख्यकांच्या भावनांना हात घालून आपल्या वर्चस्वाचा टेंभा मिरवण्याच्या हेतूने उठवलं गेलं आहे. अन्यथा  नामांतर केलेल्या आणि काही प्रस्तावित शहरांचे असंख्य हिदू बांधव पूर्वीच्या नावालाच पसंती देतात. ज्याप्रमाणे हिंदुस्थानात जन्मलेला आणि वास्तव्य करीत असलेला मुस्लिम,  खिश्चन धर्मिय, हिंदू ठरत नाही तद्वतच हैद्राबाद, उस्मानाबाद किंवा औरंगाबादमध्ये जन्मलेला, वास्तव्य करीत असलेला हिंदू हा मुस्लिम ठरत नाही. दुसऱ्यांना धर्मांध, जात्यांध ठरविणाऱ्या विवेकहन विद्वानांनी आपण स्वत: काय करतोय याचेही भान राखावे.
स्नेह सलोख्याने राहाणाऱ्या दोन भिन्न धर्मियांच्या दरम्यान अकारण वैर निर्माण करून आणि देशभरात द्वेषतिरस्काराचे वातावरण पसरवून सत्ताप्राप्तीचे शिखर सहजगत्या सर करण्याचे तंत्र ज्या सत्तापिपासू मंडळीला अवगत आहे, त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ‘‘देशाचा संसार आहे शिरावरी, ऐसे थोडे तरी वाटू या हो’’ ही उक्ती सदैव स्मरणात
राखावी.
सत्ताधाऱ्यांनी नको ते उपद्व्याप करण्यापेक्षा देशापुढे असलेल्या ज्वलंत आणि अतिमहत्त्वपूर्ण समस्या सोडविण्यास अग्रक्रम दिला पाहिजे. केवळ जातीधर्माचे राजकारण करून देशाला  उन्नतीच्या व सुखसमृद्धीच्या शिखरावर नेता येईल आणि आपला सत्ताधिकार कायम टिकून राहील अशी कल्पना करणे म्हणजे स्वप्नलोकात वावरणे होय.
खरे पाहता, आज देशाला एकजुटीची नितांत गरज आहे. आमच्या पूर्वजांनी हिंदूमुस्लिम, आपला-परका असा कुठलाही भेदभाव न पाळता एकजूट होऊन इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला  मुक्त केले. तद्वतच स्वातंत्र्योत्तर काळात देशाच्या जडणघडणीत, उत्कर्ष व उन्नतीत सर्वांचाच सहभाग आहे. या संदर्भात कोणा एकाला डावलून चालणार नाही. हा देश सर्वांचाच आहे.  अर्थात सर्वांनी मिळून देशाला सर्वतोपरी समृद्ध करण्यासाठी, जगभरात भारताची मान उंचावण्यासाठी तन मन धन अर्पण केले पाहिजे. हितशत्रू आडवे येत असतील तर वेळीच त्यांचा  उपाय केला पाहिजे. कारण न्याय जर खऱ्या अर्थाने न्याय असेल तर शांती व सुबत्ता आपसुक येते, तथापि अन्यायाचा अतिरेक देशात अराजकता माजवितो.

-शफी अन्सारी, धुळे,
मो.: ९१५८९८२३१३
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget