Halloween Costume ideas 2015

मुस्लिम राज्यकर्त्यांच्या राज्यघटना

इतिहासच्या पुर्वग्रही आकलनाच्या अभिनिवेषी धारणा इतिहासाच्या निकोप आकलनाला मर्यादा घालतात. त्यामुळे इतिहास वर्तमानातल्या राजकीय मुल्यांना पाठबळ पुरवणारे हत्यार बनायला लागते. त्यातून इतिहासाच्या अधिष्ठानावर उभ्या असणार्‍या समाजाचे प्रचंड नुकसान होते. मध्ययुगीन भारताच्या इतिहासासंदर्भात उजव्या इतिहासकरांच्या निष्ठांनी माजवलेला गोंधळ इतिहासाच्या अस्तीत्वावर घाला घालत आहे. इतिहासाविषयीचा विशिष्ट आग्रह जसा इतिहास विकृत करतो. तसा इतिहासातल्या अनेक गोष्टी नाकारुन अनुल्लेखीत ठेवतो. दुर्लक्षीत करतो. किंवा तो इतिहास नाहीच या अविर्भावात तो नाकारलाही जातो. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील मुस्लिम राजवटीतील कायदे आणि जनहीताशी कटिबध्दता हा देखील असाच नाकारला गेलेला इतिहास आहे. मध्ययुगातल्या अनेक मुस्लिम राज्यकर्त्यांनी राज्यकारभारासाठी नियम, कायदे आणि प्रशासकीय संहितेची रचना केली होती. त्या आचारसंहीतेच्या चौकटीत या राजवटी चालत होत्या.
भारतातल्या मुस्लिम राजवटी, त्यांचे प्रशासन एका विशिष्ट अशा अचारसंहितेप्रती निष्ठा बाळगून होत्या. राजवट बदलली की या अचारसंहीता बदलत असत. काही इतिहासकारांनी या आचारसंहीतांना मुस्लिम राज्यकर्त्यांच्या राज्यघटना म्हणून संबोधल्या आहेत. राजकारणाचे नियम बनवण्याची ही परंपरा प्रेषित (सल्ल.) नंतरच्या इस्लामी राजवटीच्या पहिल्या चार खलिफांपासून चालत आलेली आहे. या चार आदर्श खलिफांनी राजवटीची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या राजवटीची दिशा स्पष्ट करणारे अभिभाषण अरब जनतेसमोर दिले आहेत. त्या अभिभाषणातून त्यांनी राजवटीची आचारसंहीता सांगितली आहे. हिच परंपरा पुढे रुढ झाली. जवळपास प्रत्येक मुस्लिम राज्यकर्त्याने स्वतःच्या काही राजकीय आचारसंहीता बनवल्या आहेत. या आचारसंहीतांचा एक विशिष्ट असा इतिहास आहे. आचारसंहीतेचे मुळ स्त्रोत इस्लामी धर्ममुल्यांमध्ये आढळते. इस्लामी धर्ममुल्य मानल्या जाणार्‍या कुरआन आणि प्रेषितांच्या वचनांमध्ये राज्यकर्त्यांची कर्तव्यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. राजवटीत न्याय, समता, प्रजेचे हक्कांच्या प्रस्थापनेविषयी कुरआनने अनेक ठिकाणी मार्गदर्शन केले आहे. प्रेषित (सल्ल.) यांनी राज्यकर्त्यांना नेहमी या धर्ममुल्यांविषयी जागृत राहण्याच्या सूचना त्यांच्या अनेक वचनातून दिलेल्या आहेत. पहिल्या चार आदर्श खलिफांच्यानंतर अर्ध्या जगावर सत्ता गाजवणार्‍या इस्लामी खिलाफतीमध्ये फूट पडली. अकराव्या शतकानंतर जगाच्या कानाकोपर्‍यात अनेक स्वतंत्र मुस्लीम राजवटी अस्तीत्वात आल्या. अनेक राजवंश निर्माण झाले. जवळपास या सर्व राजवंशांनी स्वतःला खलिफांचा प्रतिनिधी म्हणून मान्यता मिळवण्याचे प्रयत्न केले आहेत. यातल्या काहींनी खलिफांच्या नावे मुद्रा देखील चलनात आणल्या आहेत.
सरफराज अ. रजाक शेख
एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर त्यामुळे राज्यकारभाराविषयी पहिल्या चार आदर्श खलिफांनी कोणते नियम आणि कोणत्या आचारसंहीता स्विकारल्या होत्या याची माहिती घेतल्याशिवाय मुस्लिम राज्यकर्त्यांच्या आचारसंहीतांविषयी संपूर्ण आवलोकन होणार नाही.
खलिफांच्या आाचारसंहिता
8 जून 632 मध्ये प्रेषित (सल्ल.) यांचे निर्वाण झाल्यानंतर इस्लामी राजवटीचे खलिफा ह.अबुबकर रजि. हे सत्तेत आले. ह.अबु बकर  रजि. यांची निवड सामान्य अरब जनतेच्या इच्छेप्रमाणे करण्यात आली होती. ह.अबु बकर रजि. हे प्रेषितांचे वारस नव्हते हे विशेष. ह.अबुबकर रजि. यांनी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच दिवशी जनतेला उद्देशून एक भाषण दिले. विस्तारभयास्तव संपूर्ण भाषण इथे देता येणार नाही. त्या भाषणात ह.अबुबकर रजि. म्हणतात, “ जर मी सन्मार्गावर जात असेल तर मला मदत करा, जर मी चुकीच्या मार्गाने जात असेल तर मला सन्मार्गावर आणा. सत्य हाच ठेवा आहे. असत्य हाच विश्‍वासघात आहे. तुमच्यातील दुबळे माझ्यादृष्टीने सबल आहेत. की जोपर्यंत त्यांच्या हक्कांची पुर्तता होत नाही., आणि तुमच्यातील सबल हे माझ्यादृष्टीने दुर्बल आहेत. की जोपर्यंत त्यांच्याकडून जे येणे योग्य आहे ते मी घेतलेले नाही. ”  या भाषणाला इतिहासात ‘लोकांना प्रदान केलेल्या हक्कांचा मॅग्नाकार्टा ’ म्हणून ओळखले जाते. मोहम्मद शेरवानी या भाषणाविषयी म्हणतात. “ या भाषणात कायद्यासमोर सर्व मनुष्य समान आहेत. या मानवी समतेवर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. ” डॉ. मोहीयुद्दीन यांनी “ त्यांचे हे उद्घाटनीय भाषण यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे की, त्यातून आपल्याला हे शिकता येते की, सार्वभौमत्त्वाचा राजाच्या अधिकाराचा पाया जनता असते. ” याचप्रमाणे प्रा. फजल अहमद, रफी अहमद फिदाई यांनी देखील ह.अबुबकर रजि. यांच्या भाषणाला ऐतिहासिक मानले आहे.  
ह.अबुबकर रजि. यांच्यानंतर प्रेषितांचे विश्‍वासू सहकारी ह.उमर रजि. यांची इस्लामी राजवटीचा दुसरा खलिफा म्हणून निवड करण्यात आली. ह.उमर रजि. हे ह.अबुबकर रजि. यांच्या वंशातून नव्हते. ही निवड देखील जनतेतून करण्यात आली होती. त्यांनीदेखील खलिफापदाची सुत्रे स्विकारल्यानंतर एक भाषण देउन आपल्या राजवटीचे मुल्याधार स्पष्ट केले होते. सुरुवातीला दिलेल्या भाषणातील मुल्यांप्रमाणे ह.उमर रजि. राज्य करत राहिले. दहा वर्ष राज्य केल्यानंतर एका अरब व्यक्तीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्लानंतर दोन दिवस ते मृत्युशी झुंज देत राहिले. पण त्यांना वाचवण्यात वैद्यांना यश आले नाही. हल्यानंतरच्या दोन दिवसात ह.उमर रजि.यांनी वारसाहक्काने खलिफा न निवडण्याचे सक्त आदेश दिले. आणि आपल्या नंतर येणार्‍या खलिफासाठी राज्याच्या अचारसंहिता सांगितल्या. त्यात ते म्हणतात, “ अल्लाहची भिती बाळगा. मुहाजीरांना न्याय द्या. सन्मान द्या, त्यांच्याशी उदारपणे वागा. त्यांच्या विशेषाधिकाराचे रक्षण करा. ” “ जिंकलेल्या प्रदेशातील लोकांशी चांगले वागा.”  “ सर्व जनतेशी न्यायाने वागा. त्यांच्या योग्य गरजा पूर्ण करा. त्यांच्या जीव आणि वित्ताच्या सुरक्षेची काळजी घ्या. गरीब श्रीमंत असा भेद करु नका. कायदे मोडणार्‍यांशी कठोर वागा. दयामाया दाखवू नका. गरीब दुर्बलांचे आधारस्तंभ बना.” “ राहणी साधी ठेवा. भपकेबाजपणा करु नका. आदर्श मुस्लीमासारखे वागा” उमर यांच्यानंतर आलेल्या ह.उस्मान रजि. आणि ह. अली रजि. या दोन्ही खलिफांनी देखील राजकीय आचारसंहीतेचे अनेक नियम सांगितले. त्यांनी देखील पहिल्या भाषणातून राजवटीची नैतिक धारणा सांगितली होती. इस्लामी राजवटीच्या आदर्श खलिफापैकी चौथे असणार्‍या ह.अली रजि. यांनी तर स्वतःचा शपथविधी पार पाडला होता. यावेळी त्यांनी जनतेच्या हिताशी कटीबध्द राहण्याची शपथ घेतली होती. लोकाभिमुख प्रशासनाची रचना केली होती. लोकांच्या हितासाठी अनेक कायदे केले होते. अधिकार्‍यांनी आणि सैन्यातील पदाधिकार्‍यांनी जनतेच्या हिताप्रतीची दक्षता कशी बाळगावी यासाठी खलिफांच्या नैतिक राजवटीत सातत्याने मार्गदर्शन केले जात होते. म्हणून या राजवटी आदर्श होत्या. या राजवटींच्या नैतीक धारणांचा वारसा घेउन पुढे जगाच्या कानाकोपर्‍यात अनेक मुस्लीम राजवटी सत्तेत आल्या. त्यांनी अनेक कायदे केले. या कायद्यांच्या माध्यमातून त्यांनी लोकहीत साधण्याचा प्रयत्न  केला.
    भारतामध्ये कुतबुद्दीन ऐबकापासून मुसलमानांच्या स्थायी राजवटीला प्रारंभ झाला. त्यानंतर रजिया सुलतानच्या काळापर्यंत या राजवटींमध्ये सातत्याने परिवर्तन आणि विकास होत राहिले. रजियाच्या काळात प्रशासनात  अनेक बदल करण्यात आले. काही कायद्यांची नव्याने निर्मिती करण्यात आली. दिल्ली सल्तनतीचा संस्थापक असणार्‍या कुतबुद्दीनने राजकारणाचे अनेक नियम बनवले होते. त्याने बनवलेल्या नियमांमुळे प्रशासनाच्या स्थापनेसाठी मोठी मदत झाली. सल्तनतकाळात म्हणजेच मुहम्मद तुघलक आणि फेरोज तुघलकाच्या काळात देखील काही कायद्यांची निर्मिती करण्यात आली होती. त्याची माहिती आपण पुढे विस्ताराने घेणार आहोत. क्रमशः
Labels:

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget