Halloween Costume ideas 2015

मुस्लिमचा मुस्लिमवर अधिकार : प्रेषितवाणी (हदीस)


    माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, जेव्हा माझा पालनकर्ता मला आकाशात घेऊन गेला तेव्हा मी तेथे काही लोकांच्या जवळून गेलो ज्यांची नखे पितळेची होती आणि ते
आपल्या चेहऱ्यावर आणि छातीवर ओरखडे काढत होते. मी जिब्रिल (अ.) यांना विचारले, ‘‘हे कोण लोक आहेत?’’ जिब्रिल (अ.) यांनी सांगितले, ‘‘हे लोक जगात दुसऱ्या लोकांचे मांस खात होते आणि त्यांच्या अब्रूशी खेळत होते.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : ‘लोकांचे मांस खात होते’ म्हणजे त्यांच्या चहाड्या करीत होते आणि त्यांची अब्रू नष्ट करण्याच्या मागे लागले होते.
    माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘एका मुस्लिमचे दुसऱ्या मुस्लिमवर सहा अधिकार आहेत.’’ विचारले गेले, ‘‘ते कोणकोणते आहेत, हे अल्लाहचे पैगंबर!’’ पैगंबर म्हणाले, ‘‘जेव्हा तू मुस्लिम बंधुला भेटशील तेव्हा त्याला सलाम कर आणि जेव्हा तो तुला जेवणाचे आमंत्रण देईल तेव्हा ते स्वीकार कर आणि जेव्हा त्याच्या तुझ्याकडून काही अपेक्षा असतील तेव्हा त्याच्या अपेक्षा पूर्ण कर आणि जेव्हा त्याला शिंक आली आणि त्याने ‘‘अलहम्दुलिल्लाह’’ म्हटले तर तू त्याचे उत्तर दे आणि जेव्हा तो आजारी असेल तेव्हा त्याची विचारपूस कर आणि जेव्हा त्याचा मृत्यू होईल तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेत सामील हो.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : सलाम करण्याचा अर्थ फक्त ‘‘अस्सलामु अलैकुम’’चे शब्द उच्चारणे पुरेसे नाही तर ही एक या गोष्टीची घोषणा व प्रतिज्ञा आहे की ‘‘माझ्याकडून तुझे प्राण, संपत्ती आणि अब्रू सुरक्षित आहे. मी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास देणार नाही’’ आणि या गोष्टीची दुआ (प्रार्थना) आहे की ‘‘अल्लाह तुझ्या ‘दीन’ व ‘ईमान’ला सुरक्षित ठेवो आणि तुझ्यावर आपली कृपावृष्टी करो.’’
    ‘तशमीत’ या शब्दाचा अर्थ आहे की शिंकणाऱ्यासाठी चांगुलपणाचे शब्द म्हणणे जसे– ‘यरहमुकल्लाह’ म्हणणे. म्हणजे ‘‘अल्लाह तुझ्यावर आपली कृपावृष्टी करो आणि तू अल्लाहची उपासना करीत राहावा आणि तुझ्याकडून अशी कोणतीही चूक घडू नये जेणेकरून दुसऱ्यांना ज्यावर हसण्याची संधी मिळावी.’’
    माननीय उकबा बिन आमिर (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांना असे म्हणताना ऐकले आहे, ‘‘मुस्लिम मुस्लिमचा बंधु आहे. जो मुस्लिम आपल्या बंधुला एखाद्या वस्तूची विक्री करेल आणि त्यात खोट असेल तर त्याने ती खोट त्याला स्पष्टपणे सांगितली पाहिजे. खोट लपविणे कोणत्याही मुस्लिम व्यापाऱ्याकरिता वैध नाही.’’ (हदीस : इब्ने माजा)
    माननीय आएशा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘चांगले चरित्र व स्वभावाच्या मुस्लिमाकडून जर एखादी चूक घडली तर त्याला काही मर्यादेपर्यंत क्षमा करा.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : एक मनुष्य सदाचारी व संयमी आहे, अल्लाहची अवज्ञा करीत नाही, अशा मनुष्याच्या हातून कधी अनावधानाने पापकृत्य घडले तर त्यामुळे त्याला तुच्छ लेखू नका, त्याला अपमानीत करू नका, त्याची ती चूक इतरांना सांगत सुटू नका, त्याऐवजी त्याला क्षमा करा. होय, जर त्याने शरियत (इस्लामी कायदा) मध्ये निश्चित असलेला अपराध केला, जसे- व्यभिचार, चोरी वैगेरे, तर अशा प्रकारचे अपराध क्षमा केले जाणार नाहीत.
मुस्लिमेतर नागरिकांचे अधिकार
    पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले,   
    ‘‘जो मुस्लिम एखाद्या मुस्लिमेतर नागरिकावर अत्याचार करील अथवा त्याचे अधिकार हिरावून घेईल अथवा त्याच्यावर त्याच्या शक्तीपेक्षा अधिक भार (म्हणजे ‘जिझिया’- विशिष्ट प्रकारचा संरक्षक कर आहे) टाकील अथवा त्याची एखादी वस्तू जबरदस्तीने हिसकावून घेईल तर मी अल्लाहच्या न्यायालयात त्या मुस्लिमाविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या खटल्यात त्या मुस्लिमेतर नागरिकाचा वकील बनून उभा राहीन.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : येथे आणखी एक गोष्ट लक्षात असू द्या की यापूर्वी शेजारी, अतिथी, आजारी आणि सहप्रवाशांचे जे अधिकार सांगितले गेले आहेत त्यामध्ये मुस्लिम व मुस्लिमेतर सारखेच आहेत.

Post a Comment

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget